मंत्री पंकजा मुंडे यांचा टोला

बीड : धार्मिक महंतांनी प्रवचन सोडून राजकारण करणे चुकीचे असून राजकारण्यांनीही धार्मिक व्यासपीठावरुन प्रवचन करू नये, असे मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. समाजात गढुळता निर्माण झाली तर विचारांची तुरटी फिरवण्याचे काम महंतांकडून केले जाते, असे स्पष्ट करत लोकशाहीत राजकारणी संविधान शस्त्राच्या माध्यमातून  सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचवू शकतात. महिलेला नेतृत्व करताना अनेक घाव सोसावे लागतात, असेही त्या म्हणाल्या.

पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील संत मीराबाई संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी झाली. या वेळी संस्थानच्या मठाधिपती राधाताई सानप, तुळशीराम गुट्टे, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री मुंडे म्हणाल्या,की जिल्ह्यासह राज्यातील सर्व धार्मिक संस्थानांना निधी देऊन विकास करण्याची संधी मिळाली. संत भगवानबाबांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. मीराबाई संस्थानच्या मठाधिपती राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने या गडाला वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. महिलांना नेतृत्व करताना जास्त घाव सोसावे लागतात, असे सांगून महंत प्रवचनकारांनी राजकारण करणे चुकीचे आहे. तसेच राजकारण्यांनी धार्मिक व्यासपीठावरुन प्रवचन करू नये असा टोलाही त्यांनी लगावला. या संस्थानाला १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. गडावर सभागृहासाठी ५१ लाख रुपयांचा निधी मंत्री मुंडे यांनी जाहीर केला.

Story img Loader