भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर गंभीर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप केलेला आहे. शिवाय, संजय राऊतांची लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आणि भाजपाकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असा संजय राऊत यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

तसेच, “आणि लक्षात ठेवा: आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!” असंही संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तर, संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवलं. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

दरम्यान सोमय्यांकडून मागील काही काळापासून होणाऱ्या आरोपांबद्दल शुक्रवारी राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “माझी संपत्ती काय असेल ती त्यांनी घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember neithr wil our govt fall nor shall i bow jai maharashtra sanjay raut msr
Show comments