सोशल मीडियावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्यात आल्याने दलित संघटनांचे कार्यकर्ते आज (सोमवारी) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरले. रास्ता रोको, मोर्चा, निदर्शने, समाजकंटकांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला.
कालही काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात दगडफेक झाली व काही भागांत बंद पाळण्यात आला. आज दुसऱ्या दिवशीही प्रतिक्रिया उमटल्या. सकाळी आरपीआयच्या आठवले गटाच्या वतीने बाजार समिती चौकात रास्ता रोको करण्यात आला व विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करणारे व त्यांच्यावर कठोर कारवाईचे निवेदन अशोक गायकवाड, अजय साळवे, संजय कांबळे, भरत कांबळे, सुरेश वाकचौरे, संतोष गायकवाड, संभाजी पवार, विनोद भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, नाना पाटोळे आदींनी प्रशासनास दिले. या वेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळी केडगावमध्ये समाजकंटकांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन भरत कांबळे, अंबादास पातोरे, विलास कांबळे, रूपेश कांबळे, सागर पगारे, संतोष साळवे, विशाल कांबळे आदींनी केले. भिंगारमध्ये कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. दुपारनंतर व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.
मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी विटंबना व पुण्यातील युवकाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी हिंदुराष्ट्र सेना संघटनेवर बंदी घालण्याची व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. मतीन सय्यद, मुफ्ती अल्ताफ मोमीन, हनिफ जरीवाला, शेख इम्रान, सय्यद रिजवान, अजरुद्दिन बागवान, शेख नदीम, शेख वसीम आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) तसेच आरपीआयचा गवई गटाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पीआरपीचे सुनिल क्षेत्रे, नितीन कसबेकर, जयंत गायकवाड, महेश भोसले, रऊफ कुरेशी, गवई गटाचे सुशांत म्हस्के, नितीन पाडळे, दीपक गायकवाड, अमित गायकवाड, मुकेश ढसाळ आदी सहभागी झाले होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा