पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या कलंकित व्यक्तीस उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घीत पत्रकारांशी बोलताना दिली. मैदानाच्या उपलब्धतेअभावी तेथे सभा घेणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट करून पाटील यांच्याविरूद्घ न्या. सावंत आयोगाने दिलेल्या अहवालाची माहिती असलेली पत्रके गावागावांमध्ये वाटण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद मतदारसंघात वाटण्यात येणारे पत्रक हे जनजागृतीसाठी आहे. त्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. भ्रष्ट, गुंडांनी पवित्र मंदिरात जाऊ नये यासाठी हे अभियान आहे. यापुढे आणखीही काही पत्रके प्रसिद्घ करण्यात येणार आहेत. मतदारांच्या जागृतीसाठी पूवीपासूनच प्रयत्न आहेत. लोक विसराळू असल्याने मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे जनजागृती सुरू करण्यात आली असून ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याचे अण्णांनी सांगितले.
पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी उस्मानाबादमध्ये जाणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी तेथे जाणार आहे. चारित्र्यवान लोकांना मत देण्याचे आवाहन करणार आहे. पाटलांव्यतिरिक्त कोणाच्या विरूद्घ प्रचार करणार का, या प्रश्नावर मी कोणाच्याही विरोधात नाही, मी केवळ मतदार जागृती करणार आहे. हा वाईट, तो चोर, लबाड, लुटारू असे आम्ही बोलत बसलो तर त्यासाठी माझे आयुष्यही कमी पडेल. मतदार जागा झाला तर अशा प्रवृत्तींना आपोआप ब्रेक लागेल असे उत्तर अण्णांनी दिले.
पाटील यांच्या विषयीची माहिती वस्तुस्थितीला धरून आहे. पी. बी. सावंत आयोगाने भ्रष्ट्राचार कसा झाला याची माहिती अहवालात दिली आहे. अशा लोकांना मत द्यायचे की नाही हे मतदारांनी ठरवावे हे मी उस्मानाबादेत जाऊन सांगणार आहे. तेथे आमची माणसे जाऊन आली. आता पत्रके वाटण्यास सुरूवात होईल. ही पत्रके गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. पाटील यांच्यासारख्या कलंकित व्यक्तीस उमेदवारी दिली त्याचा निषेध म्हणून अहिंसेच्या माध्यमातून एक दिवस उस्मानाबादेत बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असे आण्णा म्हणाले.
केवळ दराडे यांनाच पाठिंबा
बुलढाण्यात बाळासाहेब दराडे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. केवळ त्यांनाच माझा पाठिंबा असून त्यांच्या प्रचारास आपण जाऊन तेथे सभा घेणार आहोत, इतर कोणासही माझा पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील अशा एकमेव मुख्यमंत्री आहेत की, ज्यांनी समाजासाठी त्याग केला आहे. सरकारी गाडी, बंगला, पगार अशा सुविधा त्या घेत नाहीत. अशी माणसे मिळणे दुर्मीळ असल्याचे स्पष्ट करून मी त्यांच्या विचारांना पाठींबा दिला होता, त्यांच्या पक्षाला नाही. परंतु आमच्यात वाद घडवून आणण्यासाठी झारीतील शुक्राचार्य मध्येच येतील असे मला वाटले नव्हते, ते वेळीच लक्षात आल्याने बरे झाले. मात्र आपण ममता यांना दोष देत नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.
राजकीय फायद्यासाठी आपले छायाचित्र वापरल्यास उमेदवारांना जाब विचारु-हजारे
आपणासोबत काढलेल्या छायाचित्रांचा कोणी राजकीय कारणांसाठी वापर करीत असेल तर आपण संबंधित उमेदवारांना जाब विचारू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांनी दोनदा तर भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांनी एकदा राळेगणसिद्घी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांनीही हजारे यांच्यासमवेत काढलेली छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिद्घ केली होती. त्यासंदभात पत्रकारांनी छेडले असता हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम आसावा यांनी नुकतेच प्रसिद्घी पत्रकाद्वारे भाजप उमेदवार गांधी यांच्यावर हजारे यांची भेट घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. निवडणूका जवळ आल्यावरच त्यांना अण्णांची आठवण येते. एरवी हे लोक अण्णांच्या देशहिताच्या आंदोलनात सहभागी होत नाहीत. नगर अर्बन बॅंकेतील भ्रष्टाचाराशी गांधी यांचा संबंध असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी थेट हजारे यांनाच त्याविषयी विचारले. हजारे यांना आसावा यांच्या त्या पत्रकाची कल्पना नव्हती.
दिल्लीतील निवडणुकीत माझ्या फोटोचा अथवा नावाचा वापर करू नका असे पत्रक काढलेले असताना या निवडणुकीत मात्र नगर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार अण्णांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, फोटो अथवा नाव वापरू नका, तुम्ही तुमच्या हिंमतीवर लढा असे मी त्यांना सांगितले आहे. तरीही परवानगीशिवाय त्यांनी तसे केले असेल तर त्यांना मी जाब विचारीन. तुम्ही माझ्या फोटोचा व नावाचा वापर करीत आहात याचा अर्थ तुमच्यात पात्रता नाही असाच होतो, असे सांगतानाच राजकीय स्वार्थासाठी राळेगणसिद्घीस येणे योग्य नसल्याचे हजारे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा