नक्षलवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या व सध्या सातारा येथे एका हॉटेलात नोकरी करणाऱ्या हितरू रामसाय कोवासी (३०) या आदिवासी तरुणाची गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली. गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यात पेंढरीजवळ असलेल्या बोटेहूर या गावात ही घटना घडली.
२००७ मध्ये चळवळीत दाखल झालेला हितरू हा राजेश या नावाने चातगाव दलममध्ये सक्रिय होता. २०१३च्या फेब्रुवारीत तो पोलिसांना शरण आला.  
सुमारे वर्षभर साताऱ्यात काम केल्यानंतर हितरू गुरुवारी सकाळी आईवडिलांना भेटण्यासाठी गावी आला. त्याच्या पाळतीवर असलेल्या नक्षलवाद्यांनी रात्री गावात येऊन त्याला घराबाहेर ओढून त्याची हत्या केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader