कोल्हापूर : योगोपचाराने आरोग्यसंपदेचे जतन करण्याचा वस्तुपाठ घालून देणारे येथील विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक अशी त्यांची ओळख होती. केरळ येथील अलपेटा येथे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्कय़ाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात योग वार्ता या मासिकाच्या संपादिका ललिता गुंडे, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
इचलकरंजीलगतचे बोरगाव (ता. चिकोडी) हे त्यांचे मूळ गाव. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला. १८८८ मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या योग विभागाची जबाबदारी राज्यात सर्वप्रथम देण्यात आली. योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदि रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली.
त्यांच्या ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या शिबिरांनी आजवर ९०० चा आकडा पूर्ण केला आहे. त्यांचे शेवटचे शिबिर येथेच या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पार पडले होते. १९९० पासून त्यांनी १० देशांत वारंवार शिबिरे होत राहिली. परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत.
त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८ साली सुरू केली. पहिला शेतकरी लढा, जैन धर्मीय तरुणांत लोकप्रिय ठरलेल्या वीर सेवा दलाच्या कामाची पायाभरणी त्यांनीच केली. योगविषयक व्याख्यान, लिखाण याचा झरा अखंड वाहतो आहे. योगाची ६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या सीडी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेत उपलब्ध आहेत. योगप्रसारासाठी जी. जे. जी. फौंडेशनच्या माध्यमातून कामाला गती दिली. त्यांच्या या कामाला पत्नी, योग्य वार्ता या मासिकाच्या संपादिका ललिता गुंडे यांची नित्य सोबत असे. कोणत्याही संस्थेच्या आधाराशिवाय गेली ३५ वर्षे अथकपणे योग शिबिर घेऊन लोकांना निरामय जगण्याचा मंत्र डॉ. गुंडे यांनी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत दिला.
राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यावर उपचार
तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यावर त्यांनी योगोपचार केले होते. त्यामुळे त्यांना बरे वाटू लागले होते.