सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का?, गडचिरोली नक्षली हिंसाचारावर रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा घटनेचा निषेध केला आहे.
‘निषेध! या नक्षलवाद्यांचा निषेध, या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षाकर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.
निषेध! ह्या नक्षलवाद्यांचा निषेध, ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षा कर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षा कर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? https://t.co/2HsY5elrna
— Renuka Shahane (@renukash) May 1, 2019
मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.