दीपक महाले
जळगाव : एके काळी भाजपमधील दिग्गजांची जोडी म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील मतभेद दोघांच्या वाटा वेगळय़ा झाल्यानंतर दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व हे त्यामागील प्रमुख कारण असले तरी दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांची पातळी अधिकच खालचा स्तर गाठू लागली आहे. दोघांच्या वादात आता कुटुंबही खेचले जाऊ लागले आहे. महाजन यांनी खडसेंच्या मुलाचा खून की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित केल्याने आणि त्यावर खडसे यांनी फर्दापूर रेस्ट हाऊस प्रकरण आपणास माहीत असल्याचे प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंकडून जुनी प्रकरणेही उकरली जाऊ लागली आहेत. राजकारणात प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये वाद-विवाद असतातच. त्यात विशेष असे काहीच नाही. वर्चस्ववादासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, उणीदुणी काढणे हे होतच असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सध्या धोकादायक वळणावर पोहोचले आहेत. हे वाद या वळणावर पोहोचण्यासाठी विद्यमान स्थितीत जिल्हा दूध संघाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीची पार्श्वभूमी असली तरी याआधीही दोघे एकाच पक्षात असतानाही त्यांच्यात शीतयुद्ध सुरूच होते. ते आता उघडपणे सुरू झाले आहे इतकेच.
काही दिवसांपूर्वी महाजन यांनी खडसेंवर राजकारणातील घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यावर खडसे यांनी महाजन यांची पत्नीही जामनेर नगराध्यक्षासह विविध पदांवर राहिल्याने त्यांच्या घरातही घराणेशाही असल्याचे उत्तर दिले होते. महाजन यांना मुलगा असता तर मुलगा आणि सून हेही राजकारणात आले असते, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यावरून महाजन दुखावलेले होते. ते खडसे यांना योग्य वेळी उत्तर देण्याची वाट पाहात होते. ती संधी त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील खडाजंगीने मिळाली. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी औषधांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याचा प्रश्न मांडल्यानंतर खडसेंनी आक्षेप घेतला. त्यावर महाजनांनी तुमच्या घरातून पैसे जातात का, असे खडसेंना खडसावले. बैठकीनंतर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसेंवर आरोप केले.
आरोप-प्रत्यारोप
भोसरी भूखंड प्रकरणात बरेच काही समोर येत आहे. पोलीस अधिकारी अशोक सादरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातही खडसेंचे नाव आले होते, याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. आपण काय बोलतोय, याचे खडसेंना भान राहिलेले नाही. माझी बदनामी करतात. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. मात्र, हे स्वाभाविक आहे. त्यांची भोसरी खुला भूखंड प्रकरण, दूध संघातील अपहार अशा प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यातही त्यांच्याविरुद्ध सबळ असे पुरावे मिळत आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. माझ्या कुटुंबावरही ते बोलले आहेत. खडसेंना मुलगा होता. त्याचे नेमके काय झाले, त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केल्याने वादविवाद अधिकच चिघळले आहेत. खडसे यांनी महाजन यांचे वक्तव्य हीन मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे असून मुलाविषयीच्या वक्तव्याने दुखावलो गेल्याचे सांगत आपण त्यांच्या मुलाबाळांविषयी बोललो नसल्याचा दावा केला. महाजन यांच्या अनेक गोष्टी आपणास माहिती आहेत. फर्दापूर रेस्ट हाऊस प्रकरणाचाही उल्लेख खडसे यांनी केला. एकंदरीत खडसे-महाजन वादात जुन्या प्रकरणांना आता फोडणी दिली जाऊ लागली आहे.