कोयना प्रकल्पातील कोळकेवाडी धरण. या धरणाच्या पाण्याखाली ७० ते १०० फूट खोलवर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तब्बल आठ वर्षे रखडलेले हे काम एप्रिलपासून सुरू झाले असून लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. तज्ज्ञ पाणबुडय़ांच्या मदतीने ही किमया साधण्यात आली आहे. शिवाय यातून ६९ कोटींची बचत झाली आहे ती वेगळीच! पाण्याखाली जाऊन दुरुस्ती करण्याचा हा अनोखा प्रयोग राज्यात प्रथमच होत आहे.
कोयना धरणाच्या पाण्यातून वीजनिर्मिती केल्यानंतर ते कोळकेवाडी धरणात सोडले जाते. त्यानंतर पुन्हा त्यावर वीजनिर्मिती करून ते समुद्रात सोडले जाते. हे पाणी धरणातून वीजनिर्मितीसाठी जाताना त्यात दगड-माती, लाकडी ओंडके, इतर राडारोडा जाण्याचा धोका असतो. ते जाऊ नयेत म्हणून या मार्गाच्या तोंडावर विशिष्ट जाळय़ा (ट्रॅश रॅक) बसवल्या जातात. कोळकेवाडी येथे ३४ वर्षांपूर्वी अशा जाळय़ा बसवण्यात आल्या होत्या. मात्र, दहा वर्षांपूर्वी त्या निकामी झाल्या. त्यामुळे पाण्याबरोबर लाकडाचे ओंडके व इतर राडारोडा जाऊन वीजनिर्मितीची यंत्रणा खराब होण्याचा धोका होता. या कामासाठी कोळकेवाडी धरण रिकामे करणे गरजेचे होते. तसे केले असते तर वीजनिर्मिती दोन महिने बंद ठेवावी लागणार होती. महाजनकोने या कामासाठी फेब्रुवारी व मार्च २००६ मध्ये वीजनिर्मिती बंद ठेवण्याचे नियोजन केले. त्यानुसार सुमारे ८४ लाख रुपये खर्च करून जाळ्या बनवण्यात आल्या. मात्र, महाजनकोने वीजनिर्मिती बंद ठेवण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे या जाळय़ा तशाच पडून राहिल्या. त्यामुळे तज्ज्ञ पाणबुडे वापरून हे काम करण्याचे ठरले. ‘एस.एस. साठे आणि ओशन स्टार’ या कंपन्यांनी हे काम स्वीकारले. गेल्या एप्रिल-मे महिन्यात सुरुवात झाली असून, दोन महिन्यांमध्ये ते पूर्ण होईल. या यशस्वी प्रयोगामुळे धरणाच्या पाण्याखाली काम करण्याचा नवा मार्ग जलसंपदा विभागाला उपलब्ध झाला आहे.
तीन तासांची प्रक्रिया
खाडीमध्ये जहाजांची दुरुस्ती करणाऱ्या पाणबुडय़ांकडे पाण्याखाली काम करण्याचा अनुभव आहे. दाबाखाली काम करताना रक्तात नायट्रोजन मोठय़ा प्रमाणात विरघळतो. त्याला ‘केशन डिसीज्’ म्हणतात. त्यामुळे लगेचच माणूस बाहेर आला तर दगावू शकतो. त्यामुळे त्याला टप्प्याटप्प्याने बाहेर आणावे लागते. त्यासाठी तब्बल तीन तास वेळ द्यावा लागतो.