पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या कायद्याविरोधात एक वर्षापासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता. यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. अमेरिकन गायिका रिहानाने देखील ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता.
रिहानाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक बातमी शेअर केली होती. यासोबत रिहानाने लिहिले होते, “लोक याविषयी का बोलत नाहीत?” रिहानाच्या या ट्विटमुळे बराच वाद झाला होता.
दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट कले आहे. “अमेरिकन गायिका रिहानाचे आज मनःपूर्वक आभार मानायला हवे. शेती कायदे मागे घेतले जाण्यात तिचा खारीचा वाटा आहे. तिच्याच ट्विटमुळे साऱ्या जगाचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे गेलं आणि सरकारची नाचक्की झाली होती,” असे आव्हाड म्हणाले आहेत.
रिहाना नेमकी आहे तरी कोण?
रिहानाचं खरं नाव रॉबिन रिहाना फेंटी असं आहे. २० फेब्रुवारी १९८८ साली जन्म झालेली रिहाना एक बारबेडिअन पॉपस्टार असून ती मॉडल आणि प्रसिद्ध व्यावसायिकसुद्धा आहे. बारबाडोसमध्ये लहानाची मोठी झालेल्या रिहानाने वयाच्या १६ व्या वर्षीच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००५ मध्ये रिहानाने ‘म्युझिक ऑफ द सन’ हा तिचा पहिला स्टुडिओ अल्बम प्रसिद्ध केला. रिहानाचा पहिलाच म्युझिक अल्बम बिलबोर्ड २०० चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला होता. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकाराच्या यादीत रिहानाचा समावेश आहे.