शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार पडणार नाही, याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असताना, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
“जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरै काय म्हणाले? –
“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असं खैरे म्हणाले आहेत.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं सांगितलं जात आहे.