राज्यात विजेचे दर वाढले असून त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आपण कृषी, उद्योग, घरगुती, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा सर्वच स्तरावरील विजेचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी करावेत, असा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत ‘ओम गणेश’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. जयेंद्र परुळेकर उपस्थित होते. राज्य सरकारने वीज दराबाबत फेरआढावा करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीत आपण आढावा घेतला असून विजेचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी करावेत, असा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यावर सरकार लवकरच निर्णय घेईल, असे राणे म्हणाले. मराठा आरक्षणाचा अहवालही अनुकूल असा तयार करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावला जाणार नाही. हा मराठा आरक्षण अहवाल निवडणुकीपूर्वी राज्य सरकारला दिला जाईल, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली. मराठा आरक्षण अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने माझ्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. या समितीने बैठका घेऊन आढावा घेतला आहे. त्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा येणार नाही ही दक्षता घेतली जाईल. तसा अहवाल तयार करण्यात येत असल्याचेही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील चिपी विमानतळाचे काम वेगाने सुरू असून दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीला मंजुरी देण्यात आल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया केली जाईल. भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या भरपाईचा आढावाही घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा