गेल्या चाळीस वर्षांत राजकारण बदलले असून येत्या दहा वर्षांत आणखी प्रचंड बदल होणार आहेत. या बदलत्या राजकारणाचे पैलू समजून घेताना त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न पत्रकारांनी करणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज गार्डनमध्ये आयोजित दोनदिवसीय पत्रकारिता कार्यशाळेतील एका सत्रात संगोराम बोलत होते. त्यांनी ‘बदलल्या राजकारणातील पत्रकारितेची दिशा’ या विषयाची मांडणी केली. सोलापूर विद्यापीठ वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख प्रा. रवींद्र चिंचोळकर हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी लोकमंगल फाऊंडेशनचे संस्थापक,  माजी खासदार सुभाष देशमुख, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक बदलाबरोबर विज्ञान व तंत्रविज्ञानात बदल झाले, तसे पत्रकारितेतही मोठे बदल झाले. परंतु त्याची दिशा चुकली आहे. राजकारणात होणारे बदल टिपण्यासाठी पत्रकारांकडे चिकित्सक बुध्दी हवी, असे नमूद करीत संगोराम  म्हणाले, राजकारणात लोक येतात, ते राष्ट्रउभारणीसाठी किंवा समाजाच्या विकासासाठी नव्हेतर स्वत:च्या भल्यासाठी. परंतु त्यातून समाजाचेही भले होऊ शकते. त्यादृष्टीने राजकारणाकडे पत्रकारांनी निरपेक्ष बुध्दीने, अभ्यासूवृत्तीने व डोळसपणे पाहण्याची गरज आहे. सध्याच्या राजकारणातून जातीचे कप्पे करून छत्रपती शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांकडे आपण पाहतो. निदान पत्रकार म्हणून तरी आपण त्यांच्या पार्श्र्वभूमीकडे पाहिले पाहिजे. शेवटी राजकारणाचा अंतिम हेतू हा समाजाच्या विकासाशी निगडित असतो. पूर्वीच्या काळी राजकारण्याची वृत्ती ही सत्ता बळकावण्यासाठी नव्हती. अलीकडे त्यात झपाटय़ाने बदल होऊन झटपट पैसा कमावण्याचा मार्ग म्हणून राजकारणाकडे पाहिले जाते. राजकारणातील मंडळींना आता समाजकारणाशी काही देणे-घेणे राहिले नाही. अशा बदलाचा मागोवा पत्रकारांनी चिकित्सक व अभ्यासूवृत्तीने घेतला पाहिजे, अशी अपेक्षा संगोराम यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी ‘पत्रकारिता आणि बदलते राजकारण’ या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी ‘ग्रामीण विकासात पत्रकारितेचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला.

Story img Loader