सांगली : शर्यतीसाठी कायम उपलब्ध असावी यासाठी घोडींचा प्रजनन मार्गच तांब्याच्या तारेने शिवण्याचे तीन धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आले असून या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅनिमल राहत या प्राणी सेवेचे कार्य करीत असलेल्या संघटनेचे डॉ. अजय बाबर यांना तीन वर्षांच्या तीन घोड्यांच्या तीन माद्यांची योनी तांब्याच्या तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवली असल्याचे आढळून आले. सदरच्या बेवारस घोडी भारती हॉस्पिटलसमोर रक्तबंबाळ स्थितीत आढळल्याने वैद्यकीय तपासणीवेळी ही बाब समोर आली. याबाबत प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ पोळ यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – खबरदार! ‘समृद्धी’वर ‘रिल्स’ बनवणार असाल तर..
पोलिसांच्या साक्षीनेच पशुवैद्यकीय डॉ. राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सुर्यवंशी, डॉ. बाबर, गोरखनाथ कुराडे आदींच्या पथकाने तीनही घोडींना भूल देऊन योनीमार्ग शिवण्यासाठी वापरलेल्या तांब्याच्या तारा काढल्या. यानंतर या घोडींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
शर्यतीसाठी घोडीच अधिक चांगली कार्य करते. मुक्त वावर असल्याने ऐन शर्यतीच्यावेळी तिच्या गरोदरपणाची बाधा येऊ नये यासाठी हे अनैसर्गिक कृत्य केले जात असल्याचे पोळ यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी याच पद्धतीचे कृत्य समोर आले होते. या प्रकरणीही सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या गुन्ह्याचा तपासच झाला नाही. यामुळे मुजोर झालेल्यांनी पुन्हा असे कृत्य केले असावे, असे पोळ म्हणाले.