सातारा: पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पावसाच्या पाण्यामुळे मोठे तळे साचले आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्या निषेधार्थ रिपाई ए च्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रिपाई एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ, सातारा शहराध्यक्ष सिद्धार्थ समिंदर, विजय ओव्हाळ, अमोल जगदाळे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा : Ajit Pawar : “निवडणुकीत हौशे, नवशे, गवशे येतील अन्…”, बारामतीतून अजित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

यावेळी बोलताना दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, सातारा जिल्ह्यात दोनच ठिकाणी त्रिशंकू भाग आहेत. वाई आणि सातारा येथे सातारा येथील त्रिशंकू भागामध्ये विकास निधी आणण्यासाठी आम्ही प्रस्ताव केला होता. परंतु वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी तो निधी पळवला आहे. खेड ग्रामपंचायत याबाबत उदासीन आहे. तसेच या मतदारसंघातील दोन आमदार असलेले आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे प्रथम आम्ही निषेध नोंदवतो. दोघांनीही मतापुरते येथे येतात. प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता त्यांची डोळेझाक होते. सातारचे आमदार तर याकडे हद्दीत येत नसल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याशी संपर्क साधला जर प्रशासनाला हे खड्डे बुजवायचे नसतील तर आम्ही मुरूम आणून खड्डे बुजवू, पाऊस झाल्यानंतर जो राडाराडा चिखल होईल. तो चिखल नेऊन त्यांच्या केबिनमध्ये ओतून निषेध नोंदवू, होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक केरेकर यांनाही दादासाहेब ओव्हाळ यांनी आंदोलनाची भूमिका सांगितली.