जिल्हा विभाजनाच्या मागणीला बळकटी यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घालण्यात आले आहे. त्यांनीच या लढय़ाचे नेतृत्व करावे अशी मागणी विभाजन कृती समितीचे निमंत्रक विनायक देशमुख यांनी त्यांच्याकडे केली आहे.
देशमुख व काँग्रेसचे नेते डी. एम. कांबळे यांनी नुकतीच राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जिल्हा विभाजनासाठी हजारे यांना साकडे घातले. जिल्हा विभाजनाबाबत नुकतीच दक्षिण भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिका-यांची बैठक नगरला झाली. या बैठकीत बहुसंख्य नेत्यांनी या लढय़ाचे नेतृत्व हजारे यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार देशमुख व कांबळे यांनी त्यांची भेट घेतली. लवकरच दक्षिणेतील लोकप्रतिनिधीही हजारे यांची भेट घेणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
देशमुख यांनी विभाजनाची गरजेविषयीची माहिती हजारे यांना सांगितली. उत्तर व दक्षिण यातील तफावतीचीही आकडेवारी त्यांनी सादर केली. हजारे यांनी या प्रश्नावर सर्वपक्षीय नेते एकत्र आले, याचे समाधान व्यक्त केले. मात्र हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नसावे आणि राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवूनच सर्वजण त्यात सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली.