मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरात मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.

गुजरात येथील वलसाड बंदरातून हरेश्वरी मच्छीमार बोटीवर मासेमारीसाठी अरबी समुद्रात आली होती. खराब हवामानामुळे ही बोट मुरुड जवळील समुद्रात आली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे बोट बंद पडली. सोबतच्या बोटींनी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. यानंतर दिघी पोर्ट मधील टग बोटच्या साह्याने बोटीला किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तेही अपयशी ठरले. समुद्र खळवलेला असल्याने मदत व बचाव कार्यात अडखळे येत होते. रात्रभर समुद्रात हेलकावणाऱ्या बोटीत खात बोटीवरील दहा खलाशी अडकून पडले होते.

जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली, मुरुड तहसीलदार आणि अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे हे मुरुड मध्ये दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचाव करणे अशक्य असल्याने त्यांनी तटरक्षक दलाला मदतीसाठी पाचारण केले. सोसाट्याचा वारा आणि उसळणाऱ्या लाटा यामुळे बोटीतून सुटका करण्यात अडचणी येत होत्या. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

Story img Loader