अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर मधील कोलते गावात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यात प्रवाश्यांना घेऊन जाणारे एस टी बंद पडली. अडकलेल्या प्रवाश्यांना बचाव पथकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्या मुंबई पुणे मार्गावरील घटना खालापूर जवळ रविवारी सकाळी घटना घडली. २० ते २५ प्रवाश्यांना घेऊन ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र रिंकी पॅलेस समोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्याच्या मधोमध बस बंद पडली. त्यामुळे बस मधील प्रवाशी अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. धास्तावलेल्या प्रवाश्यांना बस मधून आपत्कालीन दरवाजातून सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक मुंबईकडील मार्गिकेवर वळविण्यात आली आहे.

हेही वाचा…मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू; १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू

अतिवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत

रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाने जिल्‍हयातील जनजीवन पार विस्‍कळीत झाले आहे. जिल्‍ह्याच्‍या सर्वच भागात दिवसभर पावसाच्‍या जोरदार सरी कोसळत होत्‍या. त्‍यामुळे अनेक ठिकाणी रस्‍त्‍यावर पाणी आले होते. तसेच सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे काही गावांमध्ये सखल भागात पाणी साचले होते.

मिनीडोअरसह प्रवासी बचावले

दुसरीकडे अलिबाग ते खानाव मार्गावरून ठिकठिकाणी पाणी वाहत होते. मात्र वाहनचालक धोका त्‍या पाण्‍यातून पत्‍करून त्‍या पाण्‍यातून वाहन चालवत होते. एक मिनीडोअर पाण्‍यातून येत असताना वाहून जात उलटली. स्‍थानिक नागरीकांनी आतील प्रवाशांना आणि मिनीडोअरला सुखरूप बाहेर काढले. अलिबाग रेवदंडा मार्गावर नागाव येथेही रस्‍त्‍यावर पाणी झाले होते.

हेही वाचा…विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव; मित्रपक्षांच्या नाराजीचा फटका

चिंचोटी येथील डोंगराला भेगा

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत. डोंगरातील माती सरकू लागली आहे. त्यामुळे भूस्खालानाची भीती व्यक्त केली जात आहे. दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे चिंचोटी ग्रामपंचायतीने येथील घरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची सूचना दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescue teams save passengers as st bus gets stranded in three feet of water on old mumbai pune route near khalapur psg
Show comments