लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील माण तालुक्यातील २५ गावांत लांडगा संरक्षण आणि संवर्धनासाठी अभ्यासाचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या एप्रिलमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. वन्य प्राण्यांबाबतची माहितीसंकलन व त्यांच्या संवर्धनासाठी योजण्यात येणाऱ्या आराखड्यासाठी हे पाहिले आश्वासक पाऊल पडणार आहे. विशेषतः किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून सुरू होणाऱ्या या अभ्यासासाठी वन विभागासह डब्लूडब्लूएफ इंडिया (वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर) आणि द हॅबिटॅट ट्रस्ट आणि भारतीय युवा जैवविविधता नेटवर्क – महाराष्ट्र राज्य यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच पुण्याच्या द ग्रासलँड ट्रस्ट संस्थेचे यात तांत्रिक साहाय्य व पाठिंबा राहणार आहे.
अनेक दुर्मीळ वन्यजीवांचे अधिवास असलेला माण तालुक्यातील गवताळ प्रदेश ओळखला जातो. परंतु वाढते शहरीकरण, शेतीचा विस्तार, पाणी योजनांमुळे बदलणारी शेती पद्धत आणि दगड क्रशरसारख्या मानवी हस्तक्षेपांमुळे या अधिवासांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः मेंढपाळ आणि शेतकऱ्यांमध्ये लांडग्यांविषयी नकारात्मक भावना आहे, कारण पावसाळ्यानंतर गुरेढोरांवर लांडग्यांचे हल्ले अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे या संघर्षाचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे.

दक्षिण माण तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ३७० चौ. कि.मी. क्षेत्रफळातील लांडग्यांची संख्या, अधिवासाची स्थिती तसेच मानव व वन्यजीव संघर्षाच्या स्वरूपाचे संशोधन केले जाणार आहे. स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून संवर्धनासाठी एकत्रित कृती योजना तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पिंपरी, धामणी, ढाकणी, वळई, पानवण, दिडवाघवाडी, गट्टेवाडी, गंगोती, जांभूळणी, लोधवडे, गोंदवले खुर्द, वरकुटे मलवडी, काळचोंडी, विरकरवाडी, म्हसवड, वाकी, किरकसाल, काळेवाडी, दोरगेवाडी, बनगरवाडी, कुकुडवाड, वडजल, विरळी, दिवड व नरवणे या २५ गावांमध्ये सखोल सर्वेक्षण होणार आहे.

लांडग्यांच्या हल्ल्यात दगावलेल्या शेळ्या, मेंढ्या, तसेच जनावरांचा पंचनामा लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित मेंढपाळ किंवा शेतकरी यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून वन विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यामुळे साताऱ्यातील माण तालुक्यात लांडगा संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मोठी चालना मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पहिलेच व्यापक स्वरूपातील संशोधन करण्यात येणार आहे.

भारतीय लांडग्याचे अधिवास क्षेत्र प्रशस्त असून, ते प्रशासकीय सीमा पाळत नाहीत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या शाहीर खान यांच्या संशोधनानुसार लांडग्यांचा वावर प्रामुख्याने २०० ते ३८० चौरस किलोमीटर इतक्या विस्तृत भागात आढळतो. त्यामुळे या अभ्यासाची सुरुवात ठरावीक क्षेत्रातून होईल आणि भविष्यात तो शेजारील परिसरात विस्तारला जाईल. माणदेशातील लांडगा वाचला, तर इथली माळराने वाचतील आणि माळराने वाचली, तर पारंपरिक शेती आणि मेंढपाळ टिकतील. त्यामुळे माणदेशातील जनतेने या प्रकल्पात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. -चिन्मय सावंत, वन्यजीव अभ्यासक, माण

Story img Loader