‘आपल्याकडे उत्पादन होणाऱ्या अन्नधान्यापैकी ३५ टक्के अन्नधान्य हे खराब झाल्यामुळे वाया जाते. मात्र, गॅमा रेजमुळे ही नासाडी रोखता येऊ शकते. त्यामुळे अणुऊर्जेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,’ असे मत भाभा अणुशक्ती केंद्रातील संशोधक डॉ. शरद काळे यांनी ‘बदलता महाराष्ट्र’ या ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ आयोजित उपक्रमामध्ये सोमवारी व्यक्त केले.
फोटो गॅलरीः बदलता महाराष्ट्र
लोकसत्ता आणि सारस्वत बँक आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमामध्ये ‘शेती आणि प्रगती’ या विषयावरील तिसऱ्या सत्रात ‘शेती: नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान’ या परिसंवादामध्ये शेतीच्या विकासासाठी आणि शेतक ऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर दिसून आला. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापक अतुल जैन, समुचित एन्व्हिरो टेकचे संचालक डॉ. आनंद कर्वे, भाभा अणुशक्ती केंद्रातील संशोधक डॉ. शरद काळे आणि इस्राईलचे राजदूत जोनाथन मिलर सहभागी झाले होते.  या वेळी काळे म्हणाले, ‘खाद्यतेल, डाळी यांचे उत्पादन आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. मात्र, अणुऊर्जेच्या वापराने हे उत्पादन वाढवणे शक्य आहे. त्याचबरोबर या तंत्रामुळे अन्नाचा टिकाऊपणा वाढवणे, नासाडी रोखणेही शक्य आहे. अणुऊर्जेबाबत असलेले गैरसमज काढून टाकणे गरजेचे आहे. या सगळ्या तंत्रांचा अवलंब इतर राज्यांमध्ये सध्या केला जात आहे. महाराष्ट्रामध्येही तो प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.’ डॉ. कर्वे म्हणाले, ‘‘शेतीतील निरूपयोगी मालातून देशाची ऊर्जेची गरज भागू शकते. या ऊर्जेच्या उत्पादनामधून खेडय़ांना उत्पन्नही मिळू शकते आणि त्यातून खेडी स्वयंपूर्ण होऊ शकतील.’’
‘शेतीला पुढे न्यायचे असेल, उत्पादन वाढवायचे असेल तर तंत्रज्ञान, बाजारपेठ अशा अनेक अंगाने होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतीक्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक झाली पाहिजे,’ असे मत मिलर यांनी व्यक्त केले. या वेळी जैन म्हणाले, ‘‘सर्वात जास्त मेहनत करणारा, स्रोतांचा सर्वात जास्त वापर करणारा, मात्र उत्पादन आणि बाजारपेठ या दोन्ही महत्त्वाच्या घटकांवर नियंत्रण नसलेला घटक म्हणजे शेतकरी. आहे त्या जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आणि त्यातून शेतकरी समृद्ध होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. जेणेकरून शेतकऱ्याची मेहनत कमी होईल आणि उत्पादनही वाढेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा