Reservation in Maharashtra NCP Rohit Pawar Remark : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास आपलं आरक्षण कमी होईल अशी भिती ओबीसी समुदायाला वाटत आहे. त्यामुळे ओबीसींनी देखील आंदोलन चालू केलं आहे. राज्य सरकारने अद्याप कोणत्याही समाजाचा प्रश्न मिटवलेला नाही. तसेच आरक्षणावर अद्याप ठाम भूमिका जाहीर केलेली नाही. आरक्षणाचा विषय असाच भिजत ठेवल्यामुळे सत्ताधारी टीकेचे धनी होत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की “मुळात भाजपाला आरक्षण संपवायचं आहे. मात्र ते स्वतः त्यावर बोलत नाहीत. काही त्रयस्थांना यावर टिप्पण्या करायला लावत आहेत.”
रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “भाजपाच्या विचारसरणीचे मूळ मनुस्मृतीत आहे आणि या मनुस्मृती विचारांचा आरक्षणाला विरोध असणे साहजिक आहे. त्यामुळे आरक्षण संपवण्यासाठी भाजपा पडद्यामागे अनेक हालचाली करत असते. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला मोठी ताकद दिली असल्याने आरक्षण काढून टाकण्याची भाजपची हिंमत होत नाही. म्हणूनच त्रयस्थांकडून प्रतिक्रिया देऊन भाजपा ट्रायल घेत असते.”
रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान, रोहित पवार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली आहे. “महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही”, असं वक्तव्य सोलापूर येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरून राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून रोहित पवार म्हणाले, “आरक्षण काढून टाकण्याबाबत भाजपा त्रयस्थांना प्रतिक्रिया द्यायला लावून ट्रायल घेत आहे. अशा प्रकारची ट्रायल घेणाऱ्यांना आणि ट्रायल देणाऱ्यांना महाराष्ट्र चांगला ओळखून आहे. त्यामुळे अशा विचारसरणीचे मनसुबे महाराष्ट्र कधीही यशस्वी होऊ देणार नाही. बिनशर्थ वाल्यांना कुठलीही विचारधारा किंवा दायित्व नसल्याने त्यांच्याबाबत टेन्शन नाही. परंतु, संविधान टिकवण्याचे दायित्व असलेले बहुजन नेते भाजपाच्या ट्रॅप मध्ये अडकतात याचं मात्र दुःख वाटतं.”
हे ही वाचा >> Prakash Ambedkar : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच”, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; उद्धव ठाकरेंबाबत म्हणाले…
नामोल्लेख टाळत प्रकाश आंबेडकरांवर टीका?
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्थ पाठिंबा दिला होता, त्यावरून रोहित पवारांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करत आहेत तर विरोधकांना आरक्षण प्रश्नावर जाब विचारत आहेत. त्यावरून रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd