गेल्या काही दिवसांपासून विमानतळ तसेच शाळा महाविद्यालयांसह विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात देत आहे. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही अशाचप्रकारच्या धमकीचा फोन प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर हा धमकीचा फोन करण्यात आला आहे. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कस्टमर केअरला हा फोन करण्यात आला आहे. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं आहे. तसेच मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणत त्याने फोन ठेवला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाला जाऊन तपासणी करण्यात सांगितले. मात्र, त्याठिकाणी अशी कोणतीही गाडी आढळून आलेली नाही.
दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. कुणीतरी खोडसाड वृत्तीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, आम्ही याची गांभीर्याने दखल घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd