किशोरी पेडणेकर, संजय राऊत, अनिल परबांसह ठाकरे गटातील अनेक नेत्यांविरोधात किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. त्याच किरीट सोमय्यांविरोधात संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी सोमय्यांवर आरोप केले होते. आता पुन्हा हेच ट्वीट पुन्हा रिट्वीट करून राऊतांनी प्रश्न विचारला आहे.
जुन्या ट्वीटमध्ये काय होतं?
“किरीट सोमय्या यांनी ५६०० कोटींच्या NSEL घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता घटनाक्रम समजून घ्या. किरीट सोमय्या खूप ‘तमाशा’ करतात. ईडीने मोतीलाल ओसवाल यांच्या कंपनीची चौकशी केली. त्याच मोतीलाल ओसवाल यांनी २०१८-१९ मध्ये युवक प्रतिष्ठानला भरघोस देणग्या दिल्या. गडबड आहे.” असं ट्वीट संजय राऊत यांनी ११ मे २०२२ रोजी केलं होतं.
आता काय ट्वीट केलं आहे?
११ मे २०२२ रोजी केलेलं हे ट्वीट संजय राऊतांनी आज पुन्हा शेअर केलं आहे. त्यावर “किरीट सोमय्या याचा हा अस्सल खिचडी घोटाळा असून ईडी आणि ईओडब्ल्यूने काय केलं?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. यावेळी संजय राऊतांनी किरीट सोमय्यांविषयी अश्लील शब्दोच्चारही केले आहेत.
काय होता एनएसईएल घोटाळा?
‘नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड- एनएसईएल’मध्ये ५,७५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या घोटाळ्यात आठ दलाल पेढ्या चौकशीच्या रडारवर होत्या. यामध्ये मोतीलाल ओसवाल कमॉडिटीज ब्रोकर्स प्रा. लि., फिलीप कमॉडिटीज इंडिया प्रा. लि., जिओफिन कॉमट्रेड लि., सिस्टिमॅटिक्स कमॉडिटीज सव्र्हिसेस प्रा. लि., एम्के कमॉडिटी ब्रोकर्स लिमिटेड., इंडियन बुलियन मार्केट असोसिएशन लि., आनंद राठी कमॉडिटीज लि. आणि सीडी कमोसर्च प्रा. लि. या दलाल पेढय़ांसह, केतन अनिल शहा, आचल अग्रवाल, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा. लि., पीटरसन सिक्युरिटीज प्रा. लि., सुजना सुदिनी, जोत्स्ना देसाई, कुणाल कॉमट्रेड प्रा. लि. आणि सीडी इक्वि-फायनान्स प्रा. लि या गुंतवणूकदारांचा समावेश होता. म्हणूनच, संजय राऊतांनी मोतीलाल ओसवाल कंपनीशी संबंधित किरीट सोमय्यांवर टीका केली होती.