धाराशिव: अभियंता आहे, गुलाम नाही, असे स्पष्ट पत्र लिहित धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे राजीनामा सादर केला आहे. विश्रामगृहावर व्हीआयपींची बडदास्त ठेवण्यापेक्षा अभियंता म्हणून असलेली मूळ जबाबदारी पार पाडण्यात आपल्याला स्वारस्य आहे. अनेकदा हे निदर्शनास आणूनही व्यवस्थेत बदल होत नसल्यामुळे राजीनामा स्वीकारून परिस्थितीत बदल करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे राजीनामापत्रात कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांनी नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रोहन मल्लिनाथ कांबळे यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना शुक्रवार,७ फेब्रुवारी रोजी राजीनाम्याचे पत्र सादर केले आहे. त्यामुळे बांधकाम विभागात चांगलाच गोंधळ उडाला आहे. ज्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सोडून अन्य कामांचेच ओझे अंगावर टाकले जाते. सुट्टीच्या दिवशीही विश्रामगृहात व्हीआयपींची बडदास्त ठेवण्यासाठी धावपळ करावी लागते. आपण अभियंता आहोत आणि हे काय काम आपल्यावर येवून पडले आहे, त्यामुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास होत असल्याचेही कांबळे यांनी या पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासह न्यायाधीश तसेच विविध कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, मंत्रीमहोदय यांचे शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर सतत येणे-जाणे असते. त्यांची व्यवस्था पाहण्याचे काम मलाच पहावे लागते. हे काम सुरू असतानाच एखाद्या कामाचे अंदाजपत्रक आणि वैयक्तिक आस्थापनांच्या कामाकरिता देखील विभागीय कार्यालयाकडून तगादा लावला जातो. मंत्रालयापर्यंतचा पाठपुरावाही आपल्यावरच सोपविण्यात आलेला आहे. त्याव्यतिरिक्त महसूल खात्याकडून निवडणूक कामासाठी स्पर्धा परिक्षांसाठी प्रतिनियुक्तीवर धाडले जाते आणि लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेल्या विविध बैठकांना देखील उत्तर देण्यासाठी हजर रहावे लागते. कनिष्ठ अभियंता म्हणून नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामातच कार्यालयीन वेळ संपून जातो. त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक, देयके आदी अनुषंगिक कामे वैयक्तिक वेळेत करावी लागतात. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याची मोठी कुचंबना होत आहे, ही वेटबिगारी किंवा गुलामगिरी व्यक्तिशः त्रास देत आहे. त्यातून आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्या परिने माझ्यावरील व्यक्तिशः हा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कामाची व्याप्ती पाहता, हा प्रकार वरचेवर वाढत जात आहे. सर्व प्रकारे याला विरोध करण्याचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु जातीची अस्मिता टोकदार न करता सामाजिक सलोखा जपणे हे आपले कर्तव्य समजून, व्यवस्थेला विरोध म्हणून राजीनामा देण्याचा पर्याय आपण निवडला असल्याचे रोहन कांबळे यांनी पत्रात स्पष्टपणे नमुद केले आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर २०व्या दिवशी निवडणूक कामावर

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती देण्यात आली. संबंधित महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेवून घरात घडलेल्या दुःखद प्रसंगाची माहिती त्यांना दिली. मात्र आपली मानसिक आणि कौटुंबीक  परिस्थिती समजून न घेता, मृत्यूला आता 20 दिवस उलटून गेले आहेत, अशी उध्दट प्रतिक्रिया देवून निवडणुकीच्या कामावर रूजू होण्याबाबत तंबी देण्यात आली. याच कालावधीत अनेक विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि त्यामुळे कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्यावर असलेले कामाचे ओझे, अशी दुहेरी कसरत केल्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे व्यवस्थेतील या उणिवा दूर व्हाव्यात आणि यापुढे आपल्याप्रमाणे अन्य कोणाला असा त्रास सहन करण्याची वेळ येवू नये म्हणून हा पवित्रा घेतला असल्याचे कांबळे यांनी दै. लोकसत्ताशी बोलताना सांगितले.