सोलापूर : इंटॅक या स्वयंसेवी संस्थेची सोलापूर शाखा गेल्या १० वर्षांपासून ऐतिहासिक वारसा संवर्धन व जनजागृतीचे काम करीत आहे. विविध ऐतिहासिक वास्तूंची ओळख वारसा फेरीच्या माध्यमातून नागरिकांना करून दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेच्या इंद्रभवनाची वारसा फेरी काढण्यात आली.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून आयोजित या वारसा फेरीमध्ये इंद्रभवन इमारतीच्या संवर्धनाविषयक माहिती वारसाप्रेमी नागरिकांना देण्यात आली. इंटॅकच्या सोलापूर शाखेच्या समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी स्वागत करून जागतिक वारसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित व त्यांच्या सहकारी शर्मिला अशोकन (नवी दिल्ली) यांचा या वारसा फेरीत सहभाग होता. मुनीश पंडित यांनी इंद्रभवनची वैशिष्टय़े, गेल्या शतकभरात तिच्यात केले गेलेले बरेवाईट बदल आणि त्यामुळे झालेली अवस्था यावर प्रकाश टाकला. पुढे त्यांनी संवर्धनाची प्रक्रिया कशी होते, इंद्रभवनमध्ये काय प्रक्रिया करण्यात येत आहेत, हे सांगितले. सर्वानी मुनीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रभवन वास्तुमधील विविध दालने पाहिली. भिंतीवरचे कोरीव काम, उत्तरेकडच्या भागात तिसऱ्या मजल्यावरचे लाकडी उतरते छप्पर आणि त्याची उत्कृष्ट कारागिरी, भव्य बॉलरूम व त्यावरची प्रेक्षक गॅलरी, लाकडी जिन्यांचा भक्कमपणा आदी बाबी पाहून सगळे अचंबित झाले. दर्शनी भागाच्या गच्चीवरून दिसणारा सोलापूर शहराचा देखावा पाहण्याची व कॅमेऱ्यात टिपण्याची मजा घेण्याची संधी अनेकांनी साधली. वास्तूवरील युरोपिअन शैलींचा प्रभाव तरीही भारतीय पद्धतीची चित्र शिल्पे यांची सांगड किती सुंदर आहे हे पाहून पुण्यश्लोक अप्पासाहेब वारदांच्या कलाप्रेमाला आणि दूरदृष्टीला सर्वानीच सलाम केला.
या वारसा फेरीत वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते, विद्यार्थी, इंटॅकचे सदस्य आणि वारसा नागरिक सहभागी झाले होते. किशोर चांडक, सविता दिपाली, यादगिरी कोंडा, कल्पक शहा, मनीष झांपुरे, गोवर्धन चाटला, अनिल जोशी, रोहन होनकळस, नितीन आणवेकर, अमृत ढगे, गिडवीर कुटुंब, शांता येलंबकर, श्रीरंग रेगोटी, बेला धामणगावकर, अमोल चाफळकर, रेवती डिंगरे, आशिष मोरे व कुटुंबीय, श्वेता कोठावळे, पुष्पांजली काटीकर आदींचा त्यात सहभाग होता.