पंढरपूर : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest जालना येथील मराठा समाजाच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद येथे दुसऱ्या दिवशीही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व पक्षीयांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ासमोर ठिय्या आंदोलन केले.
गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अन्यथा दहा सप्टेंबर रोजी होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी दिला. पंढरपुरात पहिल्या दिवशी सरकारची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. या वेळी सरकार विरोधी घोषणाबाजी तर रविवारी बंदची हाक दिली होती. शहरातील या बंदला प्रतिसाद मिळाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ासमोर मराठा समाज व अन्य संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमले. त्यानंतर तहसीलदार यांना एक निवेदन दिले.
शहराबरोबर ग्रामीण भागातही रास्ता रोको पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला. मात्र, बंद पुकारल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.