यवतमाळ जिल्ह्यात करोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात आज (गुरूवार)मध्यरात्रीपासून २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता हे आदेश आज दिले. मात्र हा लॉकडाउन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र जमू नये. सर्व प्रकारच्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्न समारंभ आदींकरीता केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नये, असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासनाने दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा कडक लॉकडाउन जाहीर

आठवडी बाजार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मूभा –
करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने नियम न पाळणाऱ्यांविरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपरिषद, नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठाकरे सरकारकडून ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची तयारी?

नियम गैरसमज निर्माण करणारे –
प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीची घोषणा केली आहे. मात्र अनेक नियम परस्पर विरोधी असल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे. इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा बंद राहणार असून दहावी ते बारावीचे वर्ग सुरू राहणार आहे. या वयोगटातील मुलांना करोनाची लागण होणार नाही याची प्रशासनाला खात्री आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे समारंभामध्ये केवळ ५० व्यक्तींना परवानगी आहे, तर दुसरीकडे शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी एकत्र येतात हा विरोधाभास आहे. विविध कार्यक्रमांच्या परवानगी बाबतीतही प्रशासनाची व शासनाची भूमिका संदिग्ध आहे. त्यामुळे जनतेत रोष वाढत आहे. जमावबंदीची अंमलबजावणी करताना प्रशासनाने सुस्पष्ट धोरण ठेवावे. कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी शिक्षकभारती संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केली आहे.

Story img Loader