महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्या शिवाय मंडळाने या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे.
१२ वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार या परिक्षेला यंदा २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १ हजार ८०९ विद्यार्थी परिक्षेला हजर राहिले त्यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही २५.८७ टक्के इतकी आहे. १२ वीच्या जुन्या अभ्याक्रमानुसारच्या परिक्षेसाठी १२ हजार ५३४ जणांनी अर्ज केलेला. त्यापैकी १२ हजार १६० जण परिक्षेला उपस्थित राहिले. या १२ हजार १६० जणांपैकी ३ हजार ३२२ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणे २७.३१ टक्के इतकं आहे.
१० वीच्या निकालामध्ये १२ हजार ३६३ अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १० हजार ४७७ जणांनी १० वीची परिक्षा दिली होती. उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी २९.१४ टक्के इतकी आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा तीन टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. २०२० साली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये ३२.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले.
विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहून त्याची प्रत घेता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत , पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-ssc.ac.in/ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.