सोलापूर : मुलीसमान असलेल्या सुनेवर निवृत्त डीवायएसपी सास-याने मुलाच्या अपरोक्ष लैंगिक अत्याचार करून स्वतःच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. यात पतीनेही नराधम वडिलांची बाजू घेत पीडित पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघा बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा >>> सोलापूर: प्रा. सावंत विरोधात भाजपच्या नाराजीमुळे सोलापुरात शिवसेना अस्वस्थ
निवृत्त डीवायएसपीचा शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडित तरूणीचा विवाह गेल्याच वर्षी मोठ्या थाटात झाला होता. विवाह झाल्यानंतर तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यानुसार तिने महाविद्याविद्यालयात प्रवेश घेतला होता. पती शिक्षक असल्यामुळे त्यास दररोज अध्यापनासाठी शाळेत जावे लागायचे. त्यामुळे इकडे त्याने पत्नीला शिक्षणासाठी महाविद्यालयात नेणे-आणण्याची जबाबदारी वडिलांवर सोपविली होती. त्याप्रमाणे सासरा कधी मोटारीने तर कधी दुचाकीने सुनेला महाविद्यालयात नेणे आणि घरी आणण्याचे काम करू लागला. यातूनच सास-याची सुनेवर वाईट नजर पडली. घरात अन्य कोणी नसताना सुनेला लज्जा वाटेल, असे कृत्य करू लागला.
हेही वाचा >>> सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी संचारबंदी जारी
आॕगस्ट २०२२ मध्ये त्याने सुनेवर थेट लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कोणाला सांगितल्यास माहेरी हाकलून देण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे सुनेने संयम पाळला असताना त्याचा गैरफायदा घेत सास-याने पुन्हा पुन्हा सुनेवर लैंगिक अत्याचार सुरू केले. शेवटी सहनशीलता संपल्यानंतर तिने ही आपबिती पतीच्या कानावर घातली. परंतु घडले भलतेच. पतीने तिच्यावर खोटारडेपणाचा आळ घेत वडिलांची बदनामी करते म्हणून शारीरिक व मनसिक छळ चालविला. शेवटी तिला माहेरी हाकलून दिले. नंतर तिला नांदविण्यासाठी परत आणले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील हे पुढील तपास करीत आहेत.