एकीकडे शेतीची उत्पादकता वाढत नाही तर, दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामध्ये सातत्याने बदल होत आहे. पीकपद्धतीमध्ये बदल झाला असून नको तेवढा ऊस वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी वापरणाऱ्या सर्वाना बदलावे लागेल, असे मत पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. पाण्याला आपण संपत्ती म्हणतो. पण, वापरलेल्या संपत्तीचे मोजमाप करीत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातील मंगळवारच्या दुसऱ्या सत्रात ‘शेती आणि पाणी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे आणि सोला(र)पूर जिल्ह्य़ातील अंकोली येथे ‘विज्ञान ग्राम’ साकारणारे अरुण देशपांडे यांनी सहभाग घेतला.
पारंपरिक सिंचनपद्धतीमध्ये बदल होत असून राज्यातील २०० लाख हेक्टरपैकी १६ लाख हेक्टर जमीन तुषार आणि ठिबक सिंचनाखाली आली आहे, असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, कोकण-सह्य़ाद्री भागातील २० टक्के क्षेत्रावर ५५ टक्के, पर्जन्यछायेच्या ५० टक्के क्षेत्रावर २० टक्के तर, उर्वरित २० टक्के क्षेत्रावर २५ टक्के पाऊस पडतो. हे पाणी साठविता येत नसल्यामुळे दुष्काळाच्या स्थितीला सामोरे जावे लागते. विकास म्हणजे संपत्ती आणि रोजगार निर्मिती ही उद्दिष्टे साध्य झाली. पण, सामाजिक न्याय आणि पर्यावरण रक्षण या उद्दिष्टांची पूर्ती करता आली नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), कृषी विद्यापीठांचे संशोधन आणि शेतक ऱ्यांचे कष्ट यामुळे ३० कोटी टन अन्नधान्याची निर्मिती करता आली. तर पूर्वी आयात करावा लागणारा गहू-तांदूळ आता निर्यात होत आहे, असे सांगून तुकाराम मोरे म्हणाले, ८३ टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. २०२५ मध्ये पाण्याची गरज ३० टक्क्य़ांनी वाढणार आहे. तर, दुसरीकडे लोकसंख्या १५० कोटी होण्याची शक्यता असल्याने खाणारी तोंडे वाढणार आहेत. त्यामुळे कमी जमिनीत अधिक उत्पादनासाठी प्रयत्न करावे लागतील. १०० टक्के सेंद्रिय शेतीकडे जाता येणार नाही. शेतक ऱ्याला उत्पादकता, उत्पन्न आणि शाश्वतता देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
 सूर्यशक्तीचे अन्नशक्तीमध्ये रूपांतर करतो तो शेतकरी या तत्त्वावर अंकोली येथील विज्ञान ग्रामची माहिती देत अरुण देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील घरणांचे पाणी ‘मुंठापुराना’ म्हणजेच मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या नगरांतील लोकांसाठी जाते. त्यामुळे भविष्यात १० टक्के पर्जन्यमान वाढले, तरी राक्षसी तहान कधी भागणार नाही. उसासाठी आणि वीज निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी खर्च होते. हे मॉडेल गांधीजींनी सांगितले नव्हते. ग्रामीण भागातील शहाणपण स्त्रियांकडे आहे. स्त्रीच्या नावावर १ हजार घनमीटर पाणी, १०० घनमीटर गाळ आणि १० गुंठे जमीन मिळाली, तर ती पाण्याची साठवणूक योग्य पद्धतीने करू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा