लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आल्याचे सांगून सीबीआयकडून अटकेची भीती घालत साडेपंधरा लाख रुपयांना एका वृध्द सेवानिवृत्तांना गंडा घातला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने कुरळप पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वशी (ता. वाळवा) येथील सेवानिवृत्त कर्मचारी विक्रम वसंत पोतदार (वय ७१) यांच्या भ्रमणध्वनीवर १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दोन वेगवेगळ्या भ्रमणध्वनींवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी आपण रविकुमार आणि नवजित सिन्ही बोलत असून आपण सीबीआयमध्ये आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. तुमचे नाव काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून आले असून अटक करण्याची भीती घालण्यात आली. तुमच्या बँक खात्यावरील रकमेचे लेखापरीक्षण करायचे आहे असे सांगत १५ लाख ५० हजार रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यास सांगण्यात आले.
आणखी वाचा-सांगलीतील ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम राज्य पातळीवर – दादा भुसे
या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोतदार यांनी या प्रकरणी तक्रार कुरळप पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी रविकुमार व नवजित सिन्ही या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.