सोलापूर: जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि. चे कार्यकारी संचालक करण शहा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष यतीन शहा उपस्थित होते. प्रिसिजनने डिझेलवर धावणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनचे इलेक्ट्रिक वाहन पथक वर्षभर या प्रकल्पावर पुण्यात काम करीत होते. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेने या बसची चाचणी केली आहे. या बसचे लवकरच शासनासमोर सादरीकरणही केले जाणार आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनविण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे ‘रेट्रोफिटिंग’ ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसविली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग खर्च खूप कमी असणार आहे.
प्रिसिजनने मे २०१८ मध्ये नेदरलँड्समधील ‘इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही.’ ही इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन उत्पादक कंपनी संपादित केली. इमॉसमुळे प्रिसिजन समूहाकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनाचे इलेक्ट्रीफिकेशन करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. इमॉसने आतापर्यंत ६०० पेक्षाही अधिक जड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन केले आहे. त्यानंतर ही वाहने एकूण १६ कोटी किलोमीटर्सपेक्षाही अधिक अंतर यशस्वीरीत्या धावली आहेत, असेही करण शहा यांनी सांगितले.
‘मेड इन इंडिया’
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील संधी ओळखून प्रिसिजनने नेदरलँड्समधील ‘इमॉस’ कंपनी संपादित केली होती. संपूर्णतः देशी बनावटीची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस भारतीय बाजारात आणून खऱ्या अर्थाने ‘मेड इन इंडिया’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे.
– यतीन शहा, अध्यक्ष, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.