अलिबाग : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशभक्त १६ तारखेपासून कोकणात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. गणेशभक्तांचा कोकण प्रवास सुखकर व्हावा यासाठी गोवा मार्गिकेचे काम वेगाने सुरू असले तरी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेच्या देखभालीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळ कोकणातून गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर ठरण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने मुंबईतील गणेशभक्त लाखोंच्या संख्येनी कोकणात दाखल होत असतात. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह टिपेला पोहोचतो. पण मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली ११ वर्षे रखडले असल्याने चाकरमानी गणेशभक्तांचा कोकणातील मार्ग खडतर ठरतो. यंदाही १६ तारखेपासून मुंबईतील गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी निघणार आहे. यावर्षी कोकणात जाताना त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी त्यांचा परतीचा मार्ग हा खडतर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पंकजा यांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये फडणवीस समर्थकच आघाडीवर

गणेशोत्सवापुर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दिली होती. त्याप्रमाणे मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. कशेडी बोगद्याची एक मार्गिका पूर्ण झाली आहे. कासू ते इंदापूरदरम्यानचा टप्पा सोडला तर रायगड जिल्ह्यातील एक मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा कोकण प्रवास काहीसा सुखकर होणार आहे.

हेही वाचा >>> दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

मात्र गोवा मार्गिकेचे काम वेगाने सुरू असताना महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांनी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे कोकणात जाताना गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडणार असला तरी, त्यांच्या परतीच्या प्रवासात भरमसाट खड्डय़ांची विघ्न असणार आहेत. वाताहत झालेल्या मुंबईकडील मार्गिकेमुळे गणेशभक्तांना खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return journey of ganesha devotees tough ignoring the mumbai route of the goa highway ysh