तब्बल ३० वर्षांनंतर रायगड जिल्ह्य़ातील रेवस-करंजा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवडी न्हावा शेवा सी लिंकबरोबर आता रेवस-करंजा पुलाचे कामही सुरू होण्याची चिन्ह दिसु लागली आहेत. मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने आता या पुलाच्या बांधकामासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.    बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रेवस- करंजा पुलाची घोषणा केली होती. नुसती घोषणा न करता पुलाच्या कामाला सुरुवातदेखील केली होती. मात्र अंतुले यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि पुलाच्या कामात विघ्ने आली.  पुलाच्या जोडरस्त्याचे सुरू झालेले काम अध्र्यावर थांबवण्यात आले. पुलासाठीचा मंजूर झालेला निधी पश्चिम महाराष्ट्रात नेण्यात आल्याचे जाणकार सांगतात. या गोष्टीला आज तब्बल ३० वर्षे लोटली आहेत.  मात्र पूल काही झाला नाही. आता मात्र या पुलाच्या बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. मुंबई प्रादेशिक विकास मंडळाने यासाठी पुढाकार घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. एमएमआरडीएच्या येत्या अर्थसंकल्पात पुलाच्या कामासाठी मोठी तरतूद केली जाणार आहे.
मुंबई महानगराच्या भविष्यात होणाऱ्या विकासाच्या कक्षा लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता ठाणे, कल्याण आणि रायगड जिल्ह्य़ात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून या परिसरात येणाऱ्या काळात तब्बल १९०० कोटींची विकासकामे या परिसरात केली जाणार आहेत. यात रेवस ते करंजा असा आठ किलोमीटरच्या फ्लायओव्हर पुलाचा समावेश आहे. यात रेवस खाडीवरील पूलही अंतर्भूत असणार आहे. यासाठी जवळपास ४०३ कोटी रुपये एमएमआरडीए खर्च करणार आहे.  मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात सादर होणाऱ्या एमएमआरडीएच्या बजेटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे.    त्यामुळे शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतूपाठोपाठ उरणमधील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस दरम्यानही पुलाचे काम अखेर ३० वर्षांनी मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलिबाग ते मुंबई हे तीन तासाचे अंतर पूल झाल्यास दूड तासात पूर्ण करता येण शक्य होणार आहे.
रेवस-करंजा पूल व्हावा यासाठी २००९पासून माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. आता या पुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून घेत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठाकूर यांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी अंतुलेंनी आणि रायगडकरांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अवतरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader