नांदेड: येत्या २१ ते २३ दरम्यान येथे होणार्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी नांदेड जिल्ह्यातील आमदारांनीही हातभार लावला असून या स्पर्धांसाठी नांदेड-वाघाळा मनपा आणि इतर शैक्षणिक संस्थांची मैदानी सुसज्ज केली जात आहेत. खेळाडू व इतर निमंत्रितांच्या निवास व्यवस्थेचेही नियोजन पूर्ण झाले आहे.
राज्यातील सहा महसूली विभागांसह नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त पुणे अशा ७ विभागांतील वेगवेगळ्या क्रीडा व कला प्रकारातील खेळाडू आणि कलावंत या स्पर्धांनिमित्त गुरुवारी नांदेडमध्ये दाखल होत आहेत. महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देऊन आयोजनाच्या खर्चात आपले योगदान दिल्यानंतर स्थानिक आमदारांनीही आपल्या स्थानिक विकास निधीतून या स्पर्धांच्या आयोजनाला हातभार लावला आहे. आमदारांचा निधी मिळवण्यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव जातो. त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शासनाकडून ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्य मदतींतून ही स्पर्धा पार पाडली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी येथे सांगितले.
मागील काही वर्षांत नांदेडमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धा पार पडल्या. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या खेळांची मैदाने तयार असून इनडोअर प्रकारातील खेळांसाठीही आवश्यक त्या सुविधा असल्यामुळे छ.संभाजीनगर ऐवजी या स्पर्धांसाठी नांदेडला पसंती देण्यात आली. या स्पर्धांनिमित्त गुरू गोबिंदसिंघजी स्टेडियमचे क्रिकेट मैदान हिरवेगार झाले आहे. याच मैदानावर २१ फेबु्रवारी रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
राजकीय नेत्यांची भाऊगर्दी
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे तारांकित खेळाडू तसेच कलाकारांशी वेगवेगळ्या कामांनिमित्त संबंध येत असले, तरी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या प्रभावशाली विभागाला एकही खेळाडू किंवा कलावंत उपलब्ध होऊ शकला नाही. महसूलमंत्री उद्घाटक, पालकमंत्री अतुल सावे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मंत्रिपदाचा दर्जा असलेले आ.हेमंत पाटील आणि नांदेड जिल्ह्याशी संबंधित चार खासदारांसह जिल्ह्यातील सर्व आमदार व विभागातील विधान परिषद सदस्य हे सारे मुख्य अतिथी, विविध विभागांचे आयुक्त प्रमुख अतिथी अशा राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीत उद्घाटन सोहळा पार पाडला जाणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने ‘अविरत महसूल-काल, आज आणि उद्याही’ असा संकल्प करणारे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांत जिल्हाधिकारी या नात्याने अनेक सनदी अधिकार्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी भरीव योगदान दिले. त्यांतील काही अधिकारी अद्याप सेवेत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. अशांतील राधेश्याम मोपलवार, तानाजी सत्रे, डॉ.श्रीकर परदेशी, सुरेश काकाणी, अरुण डोंगरे, धीरजकुमार, डॉ.विपिन इटनकर आणि नुकतेच बदलून गेलेले अभिजीत राऊत यांचा विशेष सन्मान उद्घाटन सोहळ्यात केला जाणार आहे.
या स्पर्धेतील खो खो खेळाच्या अंतिम सामन्यासाठी या क्रीडा प्रकारातील विश्वचषक विजेत्या, भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे ही उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या समारोपास राजकीय नेत्यांना टाळण्यात आले असून छ.संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बक्षीस वितरण व समारोप समारंभ होणार आहे.