नांदेड : महसूल आयुक्तालयाचा विषय जिव्हाळ्याचा आहे. पोलीस आयुक्तालय व तहसीलचे विभाजन ही काळाची गरज असून शासन त्याबाबत गांभीर्याने काम करत आहे. नांदेडशी संबंधित सर्व प्रश्न सकारात्मकतेने सोडवण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी भूमिका पालकमंत्री अतुल सावे यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभासाठी पालकमंत्र्यांचे रविवार (दि.23) येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वार्ताहरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मोठ्या खुबीने टोलवले. एकाही प्रश्नाचे ठोस उत्तर न देता गोलमोल भूमिका घेतली. ‘माझा अभ्यास सुरू आहे’, ‘नांदेडचे सर्व प्रश्न सोडवणार’, हे त्यांचे पालूपद होते. यावेळी भाजपचे खा. डॉ. अजित गोपछडे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, ॲड. किशोर देशमुख, विजय गंभीरे, दिलीप कंदकुर्ते आदीसह इतर उपस्थित होते.

मंत्री सावे यांनी यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची उजळणी केली. येत्या दि.3 रोजी राज्याचा अर्थसंकल्प असून त्यात नांदेडला विविध विकास कामासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आपली भूमिका आग्रही असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या निधीतही समाधानकारक वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महसूल आयुक्तालयाची जुनी मागणी असून याबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून तोडगा काढतील, तो समाधानकारक असेल असे ते म्हणाले. तहसीलचे विभाजन आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती यावर महसूल विभागाचे काम सुरू आहे. आपण स्वतः महसूल मंत्र्यंकडे पाठपुरावा करू, असे सावे म्हणाले.

नियोजन समितीच्या मागील बैठकीत पोलीस आयुक्तालयाच्या विषयावर चर्चा झाली. त्याबाबत सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितल. पुढील पाच वर्षात नदी जोड प्रकल्प व मराठवाडा वॉटर ग्रीड हे विषय मार्गी लागलेली असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किमान दोन मोठे उद्योग आणणार

छत्रपती संभाजीनगर येथे उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आपण भरपूर प्रयत्न केले. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथेही तसाच प्रयत्न करू. किमान दोन मोठे उद्योग इथे आणणार असल्याचे सावे म्हणाले. शिवाय लवकरच वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत धावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.