राज्यातील ११ विद्यापीठांतील जवळपास ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना देय असलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे ७२६ कोटी रुपये वित्त विभागाने उच्च तंत्रशिक्षण विभागला अदा केले असून, येत्या चार दिवसांत प्राध्यापकांच्या खात्यात ही रक्कम संबंधित विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालकांनी जमा करायची आहे.
राज्य सरकारने थकीत बाकी रक्कम द्यावी म्हणून एम.फुक्टो.ने तीन महिने परीक्षा बहिष्कार आंदोलन केले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मिटला, पण त्याच वेळी प्राध्यापकांची थकबाकी ३१ जुल २०१३ च्या आत अदा करण्याचे अभिवचन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले होते. त्याप्रमाणे ९०० कोटी रुपये सरकारने अदा केले, पण ७२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊनही ही रक्कम अदा करण्यास कालापव्यय करीत राहिले. संघटनेने न्यायालय अवमान याचिका दाखल केल्यानंतर ही रक्कम अदा करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
अमरावती विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. एस.व्ही रणदिवे यांनी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा या त्यांच्या अखत्यारातील पाचही जिल्ह्य़ांतील १४५ अनुदानित खाजगी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून थकबाकीच्या रकमेचा दुसरा आणि शेवटचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आला असून, प्राध्यापकांना देय असलेली रक्कम त्वरित अदा करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती विभागात जवळपास २ हजार प्राध्यापकांना २८ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, पुणे, गडचिरोली, नागपूर इत्यादी अकरा विद्यापीठातील जवळपास दीड हजार खाजगी अनुदानित महाविद्यालयातील ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना ७२६ कोटी रुपये मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा