नांदेड: साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी शासकीय तिजोरीतून अर्थसाहाय्याची खैरात केली जात असताना शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा डोलारा मात्र अधिकारी-कर्मचार्यांच्या एक दिवसाच्या वेतनाच्या वर्गणीतून उभा करावा लागत आहे.
येत्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यप्रेमी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये एकत्र जमणार आहेत. या संमेलनासाठी राज्य शासन व इतर संस्थांनी घसघशीत मदत केली आहे. त्याचवेळी नांदेडमध्ये राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील खेळाडू व कलावंत महसूल कर्मचारी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांनिमित्त येथील गुरू गोबिंदसिंघजी स्टेडिअम व इतर मैदानांवर बघायला मिळणार असून या स्पर्धेसाठी राज्यशासनाकडून तुटपूंजी मदत झाली आहे, असे येथे सांगण्यात आले.
आतापर्यंत राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा प्रत्येक महसूली विभागाच्या विभागीय मुख्यालयात पार पडत आल्या आहेत. पण यंदा नांदेड जिल्हा प्रशासनाने या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारून नांदेड मनपा, इतर शासकीय विभाग तसेच स्थानिक शैक्षणिक संस्था व गुरूद्वारा व्यवस्थापनाच्या मदतीतून स्पर्धेचे संपूर्ण नियोजन केले आहे.
महसूल विभागाचे राज्यभरातील वेगवेगळ्या कला-क्रीडा प्रकारातील खेळाडू व कलावंत मिळून सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी येत्या शुक्रवारी या ऐतिहासिक नगरीमध्ये जमणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तसेच इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर तीन दिवसांत विविध क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी मनपाच्या स्टेडिअमसह इतर मैदाने सुसज्ज करण्यात आली असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील काही आठवड्यांपासून नांदेड शहर व जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी आपली दैनंदिन कामे सांभाळून स्पर्धेची तयारी करताना दिसून आले. या स्पर्धांमध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल या मैदानी व सांघिक खेळ प्रकारांसह बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला व थाळी फेक इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. ४५ वर्षांवरील कर्मचार्यांसाठी ३ कि.मी. चालण्याची स्पर्धाही होणार आहे. स्पर्धेदरम्यान यशवंत कॉलेजच्या पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा होणार आहेत.
राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा नांदेडला घेण्याचे ठरले तेव्हा अभिजीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू झाली होती. मधल्या काळात राऊत यांची छ.संभाजीनगर येथे बदली झाली. त्यांच्या जागी राहुल कर्डिले जिल्हाधिकारीपदी रुजू झाले. त्यानंतर आयोजनाची सूत्रे आपली हाती घेत इतर अधिकारी व कर्मचार्यांच्या माध्यमातून नीटनेटक्या आयोजनात लक्ष घातले. स्पर्धेनिमित्त विविध जिल्ह्यांतून येणार्या खेळाडूंना पर्यटनाची संधी मिळण्यासंबंधीचे नियोजनही करण्यात आले आहे.