जिल्ह्य़ात फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका एस. टी.लाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हिंगोली आगारात ३१ मार्चपर्यंत ६० लाख ३१ हजार किलोमीटर फेऱ्या झाल्या. गतवर्षी हा आकडा ६ लाख ५० हजार किमी होता. गत तुलनेत उत्पन्नात घट पडल्याचे चित्र आहे.
येथील आगारात सुमारे ५६ गाडय़ा आहेत. येथून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या मार्गावर बस पाठविल्या जातात. पुणे बसफेरीतून मिळणारे उत्पन्न सर्वाधिक आहे. आगारातून सुरतसारख्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्याची गरज आहे. शहरासह जिल्हाभर अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्याच धर्तीवर आगाराच्या उत्पन्नातही घट झाली. मार्चमध्ये एस.टी.चे प्रवासी वाढले. मात्र, उत्पन्नात घट झाली. एस. टी. महामंडळाने मार्च महिन्यात प्रवासी वाढवा अभियान राबविण्याचे ठरविले होते. अभियानात जास्तीत जास्त प्रवासी वाढवून उत्पन्न वाढविणाऱ्या आगाराला पारितोषिक देण्याचे जाहीर केले होते. शिवाय चालक-वाहकांनाही बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिन्यातून १० दिवस चांगले उत्पन्न मिळविणे, तसेच सलग २४ दिवस काम करणाऱ्यांना बक्षिसे दिली जाणार होती. आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मोठय़ा थाटात अभियानाचे उद्घाटन झाले. रस्त्यात प्रवासी दिसेल तेथे वाहन थांबवून घेण्याच्या सूचना होत्या. त्याची वाहनचालकांनी अंमलबजावणी सुरू केली.
मात्र, २२ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. या काळात प्रवासी न मिळाल्याने आठ दिवस बस रिकाम्याच धावू लागल्या आणि प्रवासी वाढवा अभियानावर त्याचे सावट पसरले. आगरात ३१ मार्चपर्यंत ७ लाख ३१ हजार किमी फेऱ्या झाल्या. गेल्या वर्षी ६ लाख ५० किमी फेऱ्या झाल्या होत्या. गतवर्षी १ कोटी ३६ लाख ८४ हजारांचे उत्पन्न मिळाले. मात्र, या वर्षी त्यात किंचित घट होऊन १ कोटी ३६ लाख ३४ हजारांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत किमी फेऱ्या वाढूनही उत्पन्नात घट झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा