अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणतेही वाद उद्भवू नये म्हणून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची ठरविण्यात आलेली बाब म्हणजे साहित्य महामंडळाच्या उलटय़ा बोंबा असल्याची प्रतिक्रिया महामंडळाच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रम, विषय पत्रिका, परिसंवादातील वक्ते, निमंत्रण पत्रिका आदी सर्व ठरविण्यात संमेलन मार्गदर्शक समितीची भूमिका महत्त्वाची असते. महामंडळाच्या घटनेनुसार प्रत्येक संमेलनापूर्वी महामंडळाकडून या समितीची स्थापना केली जाते. या समितीत महामंडळाच्या घटक संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी तसेच स्थानिक संयोजन समितीमधील काही प्रतिनिधी असतात. संमेलन मार्गदर्शक समिती म्हणजेच पर्यायाने साहित्य महामंडळाचा अंकुश या सर्वावर असतो. त्यामुळे चिपळूण साहित्य संमेलनात निर्माण झालेल्या वादातून महामंडळाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही.
निमंत्रण पत्रिकेवरील परशुराम व त्यांच्या परशूचे चित्र, मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे दिलेले नाव आदींमुळे जे नाहक वाद निर्माण झाले, ते केवळ स्थानिक संयोजन समितीमुळेच आणि याचा आमच्याशी काही संबंध नाही, असे सांगून किंवा वाद होऊ नयेत, संमेलनाचा नेमका खर्च किती असावा, निमंत्रण पत्रिका कशी असावी? त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, असे महामंडळाच्या गुरुवारी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. मात्र मुळात महामंडळाची मार्गदर्शन समिती असताना अशी तत्त्वे तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. ही सर्व जबाबदारी महामंडळाचीच असल्याचे सांगण्यात आले.
महामंडळाच्या घटनेतच मार्गदर्शन समितीची तरतूद असताना पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे कितपत योग्य आहे? चिपळूण संमेलनासाठी जी मार्गदर्शक समिती नेमण्यात आली होती, त्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारेपार पाडली नाही का? मार्गदर्शक समितीने संयोजन समितीला काय मार्गदर्शन केले? असे अनेक कळीचे मुद्दे यामुळे निर्माण होत आहेत.

Story img Loader