मोदी लाटेचा गैरफायदा घेत पक्षातील कोणी गद्दारी केली आणि काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळला की नाही, याच दोन मुद्यांचा आढावा आज, रविवारी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या वाताहतीचा आढावा दि. २३ रोजी मुंबईत, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे, या मुंबईतील बैठकीत पिचड नगर दक्षिणमधील जागेच्या पराभवाची मीमांसा करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर दोनच दिवसांनी पालकमंत्री पिचड नगरमध्ये आले. त्यांनी सकाळी शिर्डीत काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेऊन चर्चा केली, यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व माजी आमदार भावुदास मुरकुटेही उपस्थित होते.  दुपारी नगरमध्ये येऊन उमेदवार राजीव राजळे यांची त्यांच्या निवासस्थानी भोजन घेत पराभवाबद्दल कारणमीमांसा केली. यावेळी आ. बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी सरकारी विश्रामगृहावर नगर दक्षिणमधील तालुकाध्यक्षांची बैठक घेतली. याच बैठकीत स्वपक्षातील गद्दार व काँग्रेसने राजळे यांचे काम केले की नाही, याबद्दल विचारणा केल्याचे समजले.
पिचड व शेलार यांनी तालुकाध्यक्षांशी स्वतंत्रपणे बंद खोलीत चर्चा केली. राजेंद्र कोठारी (जामखेड), विठ्ठलराव काकडे (श्रीगोंदे), नानासाहेब निकत (कर्जत), दत्तात्रेय अडसुरे (राहुरी), केशव बेरड (नगर), पोपटराव पवार (पारनेर), काकासाहेब नगरवडे (शेवगाव) यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. सरचिटणीस सोमननाथ धूत व किसनराव लोटके आदी उपस्थित होते.
मोदींची लाट असली तरी माझ्या मतदारसंघात (अकोले) काँग्रेसला आघाडी मिळते, तशी इतर ठिकाणी का मिळाली नाही, या लाटेचा गैरफायदा घेऊन कोणी काही उद्योग केले आहेत का, अशी सरळ विचारणा पिचड यांनी केल्याचे समजले. काँग्रेसमधील विखे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळला तर नाहीच शिवाय थोरात गटाच्या काही ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले नाही, असे तालुकाध्यक्षांकडून सांगण्यात आले.
यापुढे पराभवाने खचून जाऊ नका, उमेदीने काम करा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी सूचनाही पिचड यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा