कुंभमेळा आणि श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षांच्या पार्श्र्वभूमीवर शिर्डी व परिसरातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी शिर्डी विकास प्राधिकरणाचे पुनरुज्जीवन करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. कुंभमेळय़ाच्या पार्श्र्वभूमीवर शिर्डीसाठी १९७ कोटी तर साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी १ हजार २०० कोटींचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगीतले.
नाशिक येथे होणारा कुंभमेळा व सन २०१८ मध्ये येणारा साई समाधी शताब्दी महोत्सव या पाश्र्वभूमीवर शिर्डी येथे बुधवारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली. या बैठकीस विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर शिंदे यांनी सांगितले, की नाशिक येथे कुंभमेळय़ासाठी १ कोटी भाविक येणार असून, त्यापैकी २५ लाख भाविक शिर्डीत येण्याची शक्यता आहे. भाविकांना शिर्डीत विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच पिंपरीनिर्मळ ते निघोज या २३ किमी बाह्यवळण रस्त्याचा १९७ कोटी रुपयांचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. यापैकी १४४ कोटी रुपये बाह्यवळण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. शिर्डी शहरातील घनकच-याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५७ लाख रुपये खर्च करून पाच टनी क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती शिदे यांनी दिली. ते म्हणाले, शासनाकडे प्रलंबित असलेला ४३ कोटी रुपये खर्चाचा पाणीपुरवठा आराखडय़ाचा पाठपुरवा करण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून शिर्डीसाठी ३८० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाचाही पाठपुरावा करणार आहे.
शिर्डीतील सर्व कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवर विभागीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. या समितीने कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. शिर्डीकरांना विश्वासात घेऊन शिर्डी प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने पुन्हा पुनरुज्जीवन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 

Story img Loader