कोयता गँगवर बक्षीस लावण्यात आलं आहे. कोयता गँगची दहशत पुण्यात वाढते आहे. या अनुषंगाने कोयता गँगच्या सदस्याला पकडून देणाऱ्याला तीन हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तर बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. याबाबत अजित पवार यांनी टीका केली आहे. पोलिसांनी अशा प्रकारे बक्षीस लावलं आहे जसं गब्बर सिंगवर बक्षीस लावलं गेलं होतं किंवा वीरप्पनवर बक्षीस लावलं गेलं होतं तसं इथे का करत आहात? हे मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलंं आहे अजित पवार यांनी?
सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सापडत नसेल तेव्हा अशा प्रकारची बक्षीसं जाहीर केली जातात. तुम्हाला आठवत असेल बघा वीरप्पन सापडत नव्हता तेव्हा त्याच्यावर बक्षीस लावण्यात आलं होतं. कधीकधी हिंदी सिनेमांमध्येही आपण पाहिलं आहे की गब्बर सिंगवर बक्षीस लावलं होतं. सरसकट अशा गोष्टी होत असतील तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्न निर्माण होईल. कारण कायदा सुव्यवस्था चांगला ठेवणं हे पोलिसांचं काम आहे. अशा प्रकारे आमीष दाखवून किंवा बक्षीस मिळणार आहे सांगू लागलात तर एखादा पोलीस म्हणेल की एखाद्यावर बक्षीस लागेल तेव्हाच मी तपास करेन. वास्तविक सीसीटीव्ही, खबरे यांच्यामार्फत पोलिसांना माहिती मिळत असते. त्यावेळी पोलिसांनी नोंद घेऊन बंदोबस्त करायचा असतो. आत्ता हे जे बक्षीस सुरु करण्यात आलं आहे त्यामागे काय कारण आहे? नवे पायंडे का पाडत आहात? चार्ल्स शोभराज सारखे गुन्हेगार असतील त्यांच्यावर बक्षीस लावलं तर मी समजू शकतो. अशा प्रकारे हे का केलं जातं आहे ते मी समजून घेईन असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी पोलिसांसाठी ही बक्षीसं सुरू केली आहे
शस्त्र अधिनियम कलम ३ आणि २५ नुसार बक्षीस रक्कम १० हजार रुपये
शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार ०२ हजार रूपये बक्षीस
फरारी आरोपीला पकडल्यास १० हजार रूपये बक्षीस
हवा असलेला आरोपी पकडला तर ५ हजार बक्षीस
मोक्का लावलेला गुन्हेगार पकडल्यास ५ हजार बक्षीस
धोकादायक गुन्हेगार पकडल्यास ५ हजार बक्षीस
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या बक्षीस योजनेची माहिती पोलीस स्टेशनमधल्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना देऊन चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असंही पत्रकात म्हटलं आहे. याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.