राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागातील समस्या सोडविण्यासाठी योग्य सहकार्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार त्यासाठी तत्पर आहे. मात्र, राज्याकडून योग्य प्रस्ताव केंद्राकडे यायला हवा. दुष्काळग्रस्त भागाला केंद्राकडून निश्चितच दिलासा दिला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने गीते यांनी जिल्ह्यात समुद्रवाणी, नितळी व कोंड या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागील ३ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिकांची अपेक्षित वाढ नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावनिहाय, शेतीनिहाय पाहणी करून मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हवामानावर आधारित पीकविमा लागू झाल्यास या भागाला लाभ होईल. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
‘मोठय़ा उद्योगासाठी उस्मानाबादला प्राधान्य’
जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमी आहे. परिणामी रोजगारनिर्मिती होऊ शकली नाही. बुट्टीपुरी ते रत्नागिरी हा नवीन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातो. या चारपदरी महामार्गावर जागा उपलब्ध झाल्यास परिसरात मोठा उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देऊ. उस्मानाबादवासीयांची ही मागणी रास्त आहे. पक्षाचे खासदार, आमदार व कार्यकर्त्यांशी चर्चा करून चांगला उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करू, असेही गीते यांनी सांगितले. सोलापूर येथील कार्यक्रमात पंतप्रधानांदेखत मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याबाबत विचारणा केली असता, प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे, कोणाचाही अपमान होता कामा नये. पक्ष, पद विसरून शासकीय राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे, असे मत गीते यांनी व्यक्त केले. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ओम राजेिनबाळकर व ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची उपस्थिती होती.

Story img Loader