नगर , मुंबई : महसूलसारखे महत्त्वाचे खाते, केंद्रातील भाजप नेत्यांशी जवळीक यामुळे भाजपमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांचे प्रस्थ वाढल्याचे मानले जात असतानाच, विखे यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मतदारसंघात येत्या गुरुवारी पुन्हा दौऱ्यावर येत असल्याने भाजपमधील विखे-पाटील यांचे वाढलेले महत्त्व अधोरेखित होत आहे.
केवळ पंतप्रधान मोदीच यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह अशा अनेक भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी विखे यांच्या मतदारसंघातील, लोणी गावातील कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली आहे. याशिवाय दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या घेतलेल्या भेटींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत. भाजपच्या राष्ट्रीय शिर्षस्थ नेत्यांच्या भेटीसाठी विखे यांना कधी राज्यातील नेत्यांच्या मध्यस्थीची गरज पडली नाही. राज्यातील जुन्या किंवा मुळ भाजप नेत्यांना मोदी वा शहा यांची भेट मिळणे मुश्कील असते. पण विखे-पाटील यांना शीर्षस्थ नेतृत्वाकडून सहज भेट मिळते. सहकारावरील वर्चस्व ही विखे-पाटील यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ पाच वर्षांत घडलेला हा बदल आहे. पक्षातील राष्ट्रीय नेत्यांशी अल्पकाळात जवळीक निर्माण केली, त्याचबरोबर भाजपही विखे यांना किती आणि कसे महत्व देत आहे, याचे हे उदाहरण मानता येईल. विखे- पाटील कुटुबीय हे काँग्रेसनिष्ठ मानले जात असत. पण काँग्रेसमध्येही विखे-पाटील यांना एवढे महत्त्व कधी मिळाले नव्हते. विरोधी पक्षनेते असताना भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पंतप्रधान मोदी हे त्यांच्या आग्रहावरून लोणीमध्ये आले होते. काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधकांची संख्या कमी नाही. विखे-पाटील यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातील भाजप आमदारांची संख्या गेल्या निवडणुकीत घटली. त्याचे सारे खापर पराभूतांनी विखे यांच्यावर फोडले होते.