सैराट या सिनेमामुळे अफाट प्रसिद्धी लाभलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आता पुण्यातल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणार आहे. पुण्यातल्या नक्की कोणत्या महाविद्यालयात आणि कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा याबाबत आपला निर्णय झाला नाहीये. आपण घरातल्यांशी याबाबत चर्चा करतो आहोत असेही रिंकूने सांगितले. पुण्यात आज बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव पार पडला. या कार्यक्रमाला रिंकू राजगुरू, परशा अर्थात आकाश ठोसर आणि सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती.
या तिघांचीही मुलाखत राज काझी यांनी घेतली. या मुलाखतीत रिंकू राजगुरूने आपण पुण्यातल्या महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याचे स्पष्ट केले. ज्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि शिट्ट्या वाजवून तिच्या या उत्तराला प्रतिसाद दिला. रिंकूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के गुण मिळाले होते. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
सैराट सिनेमा, त्यातला अभिनय, सिनेमाचा एकूण अनुभव या सगळ्याबाबत आर्ची अर्थात रिंकू, परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे या सगळ्यांना राज काझी यांनी बोलते केले. बालगंधर्व मंदिरात तरूणांनी मोठी गर्दी केली होती. रिंकू राजगुरू ज्या कार्यक्रमाला जाते तिथे कार्यक्रमाच्या आयोजकांना बाऊन्सरही ठेवावे लागतात, आज बालगंधर्व नाट्य मंदिराच्या बाहेरही हेच चित्र बघायला मिळाले. सिनेमाच्या प्रवासाबाबत दिलखुलासपणे बोलत आणि आपले अनुभव उलगडत तिन्ही कलाकारांनी दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीला आणि बालगंधर्व नाट्यमंदिराच्या सुवर्ण महोत्सवाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सैराट या मराठी सिनेमाने घडवलेला इतिहास महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. या सिनेमात आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरू या अभिनेत्रीला अल्पावधीत मोठी प्रसिद्धी मिळाली. तिची भूमिका, तिने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, तिचा बिनधास्त अभिनय सगळ्या महाराष्ट्राला भावला. त्याचमुळे रिंकूला रिंकूऐवजी महाराष्ट्र आर्ची म्हणूनच ओळखतो. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झाले. आता रिंकू पुण्यात शिकणार आहे म्हटल्यावर पुणेकरांच्या उत्साहाला उधाण आले नसते तरच नवल!