अकोला आणि शेगावमध्ये काल दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सातत्याने दंगली उसळत असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने दंगली घडवून केलेली आहे. परंतु, मी त्यांना आठवण करून देईन की शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्त्वाखाली शिवशाही सरकार होतं. या शिवशाही सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्याकाळात एकही दंगल झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळातही एकही जातीय तणाव झाला नाही. आता मिंधे गटासोबत युती केल्यानंतर कितीतरी दंगली झाल्या. छत्रपती संभाजी नगर, अकोला, शेगावला दंगल झाली, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
हेही वाचा >> Akola Dangal : महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही संस्था…”
तसंच वातावरण खराब होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत नाहीत. मिंधे गटाला सांभाळण्यातच त्यांचा वेळ जातोय. लोकसभेची तयारी करण्याकरता जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हनुमंतांचं नाव घेऊन मतदान करा म्हणणाऱ्यांची काय परिस्थिती झाली त्यांची पाहा. हनुमान आमच्या हृदयात आहेत, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
अकोल्यात दंगल
इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती आटोक्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या दंगलीविषयी माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक शुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांचं नुकसान सुरू केलं, काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला.