किरण बेदी यांच्या ताज्या फारकतीमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन मळलेल्या वाटेनेच मार्गक्रमण करीत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जवळच्या सहकाऱ्यांशी मतभेद किंवा उभयतांपैकी कुणी तरी बाजूला जाण्याची आंदोलनातील परंपरा बेदींच्या ताज्या निर्णयामुळे पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाली. जनलोकपाल विधेयकाच्या मुद्दय़ावरच दोघांमध्ये वितुष्ट आल्याने हा चर्चेचा विषय बनला असून, या मतभेदाच्या परंपरेत आता बेदींचाही नंबर लागल्याने या पाश्र्वभूमीवर अनेकांनी यानिमित्ताने जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
कालपरवापर्यंत या टोकाची त्या टोकाला तिरंगा फडकावत हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनात वातावरण तापवणाऱ्या किरण बेदींनी याच आंदोलनाच्या मुद्दय़ावर वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या जनलोकपाल विधेयकाला हजारे यांनी विरोध केला, बेदी यांनी मात्र हे मंजूर विधेयक स्वीकारले आहे. येथेच दोघांमध्ये ठिणगी पडली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या जनलोकपाल विधेयकात सीबीआयसारख्या यंत्रणा अजूनही या कार्यकक्षेबाहेर आहेत, शिवाय भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या अनेक शिफारशी सरकारने स्वीकारल्याच नाही, त्यामुळे हे फसवे विधेयकच केंद्र सरकारने मंजूर केल्याचा आक्षेप घेत हजारे यांनी त्याला विरोध केला. बेदी यांना मात्र हे विधेयक सक्षम वाटले. त्यात संशोधनाला वाव असला तरी त्यांनी स्वीकार करीत हजारे यांच्यापासून फारकत घेतली.
हजारे यांच्या चळवळीत सहभागी असलेल्या किंवा या मांडवाखालून गेलेल्यांनाही ही अपेक्षित घटना वाटते. त्यामुळेच गतस्मृतींना उजाळा दिला जातो. ग. प्र. प्रधान, बाबा आढाव, अविनाश धर्माधिकारी, विजय कुवळेकर यांची उदाहरणे अजूनही लोकांना ताजी वाटतात. या मंडळींनी जाहीर वाच्यता करण्याचे त्या वेळी जाणीवपूर्वक टाळले, मात्र ते हजारे यांच्या व्यासपीठावर पुन्हा दिसले नाहीत, यातच सारे काही आले. त्यातच आधी स्वामी अग्निवेश, मग अरविंद केजरीवाल, भूषण पिता-पुत्र, प्रवीण सिसोदिया यांच्यासह त्यांचा पक्ष आणि आता किरण बेदी यांचीही भर पडली. अण्णांच्या दृष्टीने त्याही आता या रांगेत जाऊन बसल्या आहेत. चळवळीच्या मांडवाखालून गेलेल्यांना या गोष्टीबद्दल वाईट वाटत असले तरी त्यात अस्वाभाविक असे काही वाटत नाही. चळवळीविषयी असलेल्या आस्थेमुळे त्यांना वाईट वाटते, मात्र हजारे यांच्या आंदोलनाचा हा आता ठरलेलाच टप्पा आहे अशी टिप्पणीही केली जाते. अरविंद केजरीवाल आणि हजारे यांच्यामध्ये राजकीय पक्षाच्या स्थापनेची ठिणगी पडली. ही गोष्ट हजारे यांना मान्य नव्हती, त्यावरूनच दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्या वेळच्या या सिव्हिल सोसायटीत राजकीय पक्षनिर्मितीच्याच कारणावरून उभी फूट पडली असताना किरण बेदी यांनी केजरीवाल आणि कंपनीला रामराम ठोकून हजारे यांची खंबीर साथ केली.
हे सर्व का दुरावले?
अण्णा हजारे यांचे आंदोलन राज्याच्या स्तरावर होते, त्या काळात ग. प्र. प्रधान, बाबा आढाव ही मंडळी त्यांच्याबरोबर होती. आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली तसतशी ही मंडळी आधी अण्णांपासून आणि मग या आंदोलनापासूनच बाजूला झाली. गांधीवादी उद्योगपती नवलमल फिरोदिया यांनी हजारे यांना भक्कम साथ दिली, मात्र नवलमलजींनंतर फिरोदिया कुटुंबातील कोणीही राळेगणसिद्धीत कधी दिसले नाहीत. ही यादी वाढत जाऊन किरण बेदी यांच्या ताज्या फारकतीपर्यंत आली आहे.
अण्णांपासून फारकत घेणाऱ्यांची यादी वाढती
किरण बेदी यांच्या ताज्या फारकतीमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन मळलेल्या वाटेनेच मार्गक्रमण करीत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जवळच्या सहकाऱ्यांशी मतभेद किंवा उभयतांपैकी कुणी तरी बाजूला जाण्याची आंदोलनातील परंपरा बेदींच्या ताज्या निर्णयामुळे पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाली.
First published on: 05-02-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riseing list of who are out goings from anna team