रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका संपुर्ण कोकणासह जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडावरिल कै-या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच कै-या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत. याप्रकारामुळे आंबा बागायतदार चांगलाच धास्तावला असून यामुळे आंबा बागायतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील काही दिवस उष्णतेची लाट आल्याची परीस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मनुष्य आणि वन्यजीव प्राण्यांवर मोठा विपरीत परिणाम होत आल्याचे दिसत आहे. मागील चार दिवसामध्ये उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे. या उष्णतेच्या परिणाम आंबा बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. प्रखर उष्णतेमुळे आंबा करपू लागला आहे. यामुळे आलेल्या कै-या काळ्या पडू लागल्या आहेत. तसेच कै-या गळून पडण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे.

बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी आंबा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडतो. यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे आणि पडलेल्या थंडीमुळे आंबा पीक मुबलक प्रमाणात येण्याची आशा बागायतदारांना होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र मोहर आल्याच्या मानाने फळधारणा कमी झाली. असे असतानाच या वर्षी आंबा पीक उष्णतेचे शिकार बनले आहे.

जिल्ह्यातील बागायतदार आंबा पीक वाचविण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे पहावयास मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे लहान मोठे पंचवीस हजारांच्या वर आंबा बागायतदार आहेत. त्यामुळे या सर्वांनाच आंबा व्यावसायात नुकसान सहन करण्याची भीती वाटू लागली आहे.

नैसर्गिक संकट आणि उष्णतेमुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी आंबा पिकाचे उत्पादन २० ते १५ टक्क्यावर येण्याची शक्यता आंबा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. वाढत्या उष्णतेवर आंबा व्यावसायिकांकडे कोणताच उपाय नसल्याने यावर्षी आंबा बागायतीदारांना कोठ्यावधी रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच आंबा उत्पन्न कमी झाल्यास उपलब्ध आंबा फळाचा दर ही वाढणार आहे.

गतवर्षीच्या मानाने यावर्षी उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. आंबा बागायतदारांनी आंबा झाडांना जास्त वेळ पाणी घालण्याची गरज आहे. तसेच फळांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी कागदी पिशव्याचा वापर करुन फळांचे संरक्षण करावे. इतर कोणताच उपाय या उष्णतेवर करणे शक्य नाही. -डॉ.किरण मालशे, नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी.

आंबा बागायत आता दरवर्षी आर्थिक संकटात सापडत आहे. आशेवर आता आंब्याचा व्यावसाय करावा लागत आहे. मात्र असेच चालत राहिल्यास आंबा उत्पादन घेणे कठिण होणार आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. -संतोष मयेकर, आंबा बागायतदार

जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून आंबा, काजू तसेच इतर पिकांवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांनी बागायतीला तीन वेळ पाणी घालावे असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे

Story img Loader