“आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे”, अशी भावना अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भावाला सावरण्यासाठी दुसरा भाऊ अमित देशमुख पुढे सरसावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपलं. या दोन भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो, हाच संदेश विलासराव आणि दिलीपराव यांनी दिला. आज विलासराव यांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली…”, असे रितेश देशमुख म्हणाले आणि ते गहिवरून आले. रितेश देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना सावरण्यासाठी अमित देशमुख पुढे सरसावले. काही वेळ थांबून रितेश देशमुख यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. “आम्हाला वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच मागे उभे राहिले”, असेही रितेश यावेळी म्हणाले.

“विलासराव जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा मांजरा सहकारी कारखान्यावर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. ते विमानतळावरून आल्यानंतर मंदिरात गेले नाहीत. ते थेट कारखान्यावर आले आणि दादांच्या (विलासरावांचे वडील) पायावर डोकं टेकवलं आणि मग भाषण केलं. विलासराव भाषण करत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यावेळी काका (दिलीपराव देशमुख) उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि साहेबांना म्हटले कम ऑन यू डू इट… एका भावाने दुसऱ्या भावाशी कसं वागलं पाहीजे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होतं”, अशी आठवण रितेश देशमुख यांनी सांगितली.

“दिलीपराव काकांना अनेकदा बोलता आलं नाही. पण मी आज सर्वांसमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहीजे, याचे ज्वलंत उदाहरण आज इथे तुमच्यासमोर आहे”, असेही रितेश देशमुख म्हणाले.

आमदार अमित देशमुख यांच्याकडू लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच. पण महाराष्ट्राच्याही तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असे गौरवोद्गार रितेश देशमुख यांनी आपला भाऊ अमित देशमुख यांच्यासाठी काढले आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh gets emotional while speaking on father vilasrao deshmukh brother amit deshmukh comes to support kvg